वर्ध्यात बापूंनी नाकारलेल्या अतिरेकी विकासालाच मिळतेय चालना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 11:53 AM2020-08-13T11:53:25+5:302020-08-13T11:55:21+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी अतिरेकी विकासाला नाकारून वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्याला प्राधान्य दिले होते. मात्र, त्यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांना पूर्णत्वास नेण्याच्या खटाटोपात त्यांच्या काळात लावलेली शेकडो अजस्त्र वृक्ष धाराशाही केली जात आहे. त्यामुळे बापूंना नको असलेला निसर्ग ‘भकास’ करणारा ‘विकास’ चक्क गांधीभूमीतच होत असल्याने गांधीविचारक व पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत.
महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. या आराखड्यांतर्गत दत्तपूर-वर्धा-सेवाग्राम या मार्गाचे चौपदीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामाकरिता आतापर्यंत ७० वृक्ष तोडण्यात आले असून १७० वृक्ष तोडण्याची तयारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आली आहे. वर्धा ते सेवाग्राम या मार्गालगत लावलेले बहुतांश वृक्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी यांच्या काळातील आहेत. जवळपास ७५ ते ८० वर्षांपासून वर्धेकरांना शुद्ध हवा आणि सावली देणाऱ्या या वृक्षांचे आता विकासाच्या झंझावातात सरपण होत आहे. वृक्षांची होणारी ही कत्तल गांधीविचार, पर्यावरणप्रेमी व वर्धेकरांना असहनीय असल्याने त्यांनी याला विरोध दर्शवून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. वृक्षांच्या संवर्धनासाठी गांधीभूमीतील आंदोलनाची धग आता समाजमाध्यमांद्वारे देशपातळीवरही पोहोचली आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत दत्तपूर ते सेवाग्राम या जवळपास १२ किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गांतर्गत ३ हजार वृक्ष येतात पण, ते रस्त्यामध्ये येऊन अपघातास कारण ठरण्याची शक्यता आहे, असे १७० वृक्ष तोडावे लागणार आहेत. आता पर्यावरणप्रेमींच्या भावनांचा विचार करून फेरसर्वेक्षण सुरू केले आहे. यापैकी किती वृक्ष वाचविता येतील, याची माहिती घेतली जात आहे. सोबतच तोडलेल्या वृक्षांच्या तुलनेत जास्त वृक्ष लावले जाणार आहेत.
- गजानन टाके, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वर्धा.
ज्या महात्मा गांधींनी वृक्षांचे संवर्धन करण्याला प्राधान्य दिले, त्याच महात्म्याचा १५० वा जयंती महोत्सव वृक्षांची कत्तल करून साजरा करण्यात येत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण तो वृक्षतोड करून, पर्यावरणाला हानी पोहोचविणारा नसावा. याबाबत तात्काळ काय तो निर्णय घ्यावा, अन्यथा चिपको आंदोलन केले जाईल.
- संजय इंगळे तिगावकर, बहार नेचर फाउंडेशन,वर्धा.