वर्धेकर घेताहेत ‘कोरोना’ विषाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:00 AM2020-04-11T05:00:00+5:302020-04-11T05:00:25+5:30
वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविड-१९ (कोरोना) या विषाणूने देशात नव्हे तर जगात थैमान घातले आहे. असे असले तरी वर्धेत अद्यापही कोराना एकही रुग्ण आढळला नाही. शिवाय दक्षता म्हणून प्रत्येक नागरिकाने घरात थांबण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र, वर्धेतील अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून ‘कोरोना’ नामक विषाची परीक्षाच घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी संबंधित यंत्रणेने करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वर्धा जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या यवतमाळ, नागपूर तसेच अमरावती येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शेजारच्या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दुध, भाजीपाला, फळ व मांस या जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेत विविध दुकाने उघडण्याची मुबा देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा संचारबंदीच्या काळात सध्या काही नागरिक घेताना दिसत आहेत. मॉर्निंग वॉक यासह विनाकारण काही तरुण तसेच व्यक्ती घराबाहेर पडत असल्याने ठिकठिकाणी गर्दी होत आहेत. कोरोनाला हरवायचे असल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच घराबाहेर न पडणे हाच एकमेव प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. परंतु, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात स्वत:ला क्वारंटाईन करून घेतलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी सूजान नागरिकांकडून केली जात आहे.
उन्ह वाढताच रस्ते निर्मनुष्य
भाजीपाला, दुध, औषध आदी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकांनाना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. असे असले तरी तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच ग्राहकांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. नियोजित कालावधीत सदर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडे राहत असून तेथे जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले जात आहे. असे असले तरी विनाकारण घराबाहेर पडणारे याच कालावधीत घराबाहेर पडतात. शिवाय ऊन वाढल्यावर ते घरचा रस्ता पकडत असल्याचे आणि सायंकाळी पुन्हा घराबाहेर पडत असल्याचे बघावयास मिळत आहे.
कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने घरात थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडून गर्दी केल्यास कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ शकत असल्याने वर्धा जिल्ह्यात संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी व्हावी.
- डॉ. प्रवीण धाकटे, लॉयन्स मेडिकोज, वर्धा.
वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढलेला नाही. त्यामुळे वर्धा सध्या सेफझोन आहे. परंतु, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळत घरीत थांबणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांमुळे घरात थांबलेल्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने किमान १४ एप्रिलपर्यंत संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
- अवचित सयाम, अध्यक्ष, बॅक ऑफ इंडिया, एससी, एसटी, ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन, वर्धा.
कोरोनाशी लढा देण्यासाठी न.प. व नगरपंचायतीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी जीवाचे रान करीत आहेत. परंतु, काही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडून कोरोना या विषाणूजन्य आजाराला आमंत्रणच देत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी.
- दीपक रोडे, माजी प्रशासकीय अधिकारी, न.प. वर्धा.
जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. त्यानंतर त्यांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून केली जात आहे. तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांचे वाहन जप्त केली जात आहे. वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचे कोरोनाशी लढा देणाऱ्या यंत्रणेला उत्तम सहकार्य राहिले आहे. परंतु, नागरिक विनाकारण रस्त्यांवर येत असेल तर खाकीलाही कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. प्रत्येक नागरिकाने घरातच राहून कोरोनाशी लढा देणाऱ्यांना सहकार्य करावे.
- नीलेश मोरे, अपर पोलीस अधिकारी, वर्धा.