तुर्कस्तानच्या कांद्याकडे वर्धावासियांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:04 PM2020-01-13T16:04:18+5:302020-01-13T16:07:03+5:30
वर्ध्याच्या बाजारपेठेत तुर्कस्तान येथील कांदा रविवारी दाखल झाला. या कांद्याच्या खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी मात्र, पाठ फिरवली आहे.
चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कांद्याच्या भाववाढीमुळे सर्व सामान्यांच्या डोळ्यात पाणी आले असतानाच आता दर नियंत्रणासाठी वर्ध्याच्या बाजारपेठेत तुर्कस्तान येथील कांदा रविवारी दाखल झाला. या कांद्याच्या खरेदीकडे शहरातील ग्राहकांनी मात्र, पाठ फिरवली आहे.
कांद्याच्या भावाने शंभरी ओलांडल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात कांदा मिळावा म्हणून तुर्कस्तानमधील कांदा रविवारी बाजारात दाखल झाला. इजिप्तच्या कांद्यापेक्षा तुर्कस्तानातील कांद्याचा दर्जा चांगला आहे. तुर्की कांदा महाराष्ट्रातील कांद्याप्रमाणे भरीव असून रंगाने पिवळसर आहे. इजिप्तचा कांदा पोकळ असल्याने त्याला ग्राहकांकडून फारशी मागणी नाही. पण, त्याचपाठोपाठ बाजारात दाखल झालेल्या तुर्की कांद्यालाही नागरिकांनी नापसंत केले आहे.
कांद्याचे भाव वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी सामान्यांच्या डोळ्यात भाववाढीमुळे पाणी आले. परदेशातून कांदा आयात करण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला होता. नवीन कांद्याची मोठी आवक होत नसल्याने जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. वर्ध्यातील बाजारपेठेत तुर्की कांद्याची विक्री ३५ ते ४० रूपये किलो दराने सुरू आहे. तुर्की कांद्याला चव नाही. त्यामुळे ग्राहक आकाराने मोठ्या दिसणाऱ्या या कांद्याविषयी केवळ चौकशी करतात. मात्र, खरेदी करीत नाहीत. वर्ध्यातील बजाज चौकातील बाजारपेठेत व्यावसायिक नरेंद्र भगत यांच्या दुकानात १ टन कांदा आला आहे. मात्र, कांद्याचे एकही पोते विकल्या गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक कांद्याचे भाव १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने त्यांनी या कांद्यांची विक्री बाजारात सुरू केली असल्याचे ते म्हणाले. पण, हॉटेलचालक, खाणावळ चालवणाऱ्या मंडळींनी हा कांदा खरेदी करण्यास नापसंती दर्शविली आहे. अपेक्षित उठाव नसल्याने विक्रेतेही हैराण झाले आहेत.
मुंबईच्या बाजारपेठेत कांदा फेल
मुंबईच्या बाजारपेठेतही तुर्की कांद्याला नागरिकांनी नापसंती दर्शविली असून हा कांदा फेल ठरला आहे. नागरिकांची महाराष्ट्रातील कांद्यालाच पसंती असल्याचे दिसून येत आहे.
विदेशी कांदा कशाला?
बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सरकारने विदेशातून कांदा आणला आहे. सध्या देशात असणारे कांद्याचे दर आणि विदेशातून मागविलेल्या कांद्याचे दर सारखेच आहेत. असे असताना तुर्कस्तान आणि इजिप्तमधील कांदा कशाला हवा? असा प्रश्न ग्राहक उपस्थित करीत आहे.
रविवारी तुर्कस्तान येथील १ टन कांदा दाखल झाला. मात्र, अपेक्षित उठाव नसल्याने हा कांदा अजूनही दुकानात पडून आहे.
- नरेंद्र भगत, कांदा विक्रेता
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तुर्कस्तान येथून दाखल झालेला कांदा घेतला; पण, या कांद्याची चव बेचव आहे.
- पुष्पा ठाकरे, ग्राहक
किरकोळ बाजारात जुन्या कांद्याची विक्री १०० ते १२० रूपयेपर्यंतच्या भावाने केली जात आहे, सर्वसामान्यांना जुना कांदा घेण्यास नाकी नऊ येत असताना तुर्की कांदा बाजारात दाखल झाला. पण, त्या कांद्याला चवच नाही. त्यामुळे आम्ही कांदा खाणेच आता टाळत आहे.
- संतोष लेंडे, ग्राहक