वर्धा पालिकेतर्फे पालकमंत्री चषक खो-खो स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 10:04 PM2017-12-26T22:04:02+5:302017-12-26T22:04:13+5:30
सध्याचा युवक मोबाईलमध्ये हरविला आहे. तो मैदानावर असतानाही मोबाईलवरच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याला पुन्हा मैदानावर एक खेळाडू म्हणून आणण्याकरिता नगर परिषदेच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जुना आरटीओ मैदानावर .....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्याचा युवक मोबाईलमध्ये हरविला आहे. तो मैदानावर असतानाही मोबाईलवरच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याला पुन्हा मैदानावर एक खेळाडू म्हणून आणण्याकरिता नगर परिषदेच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जुना आरटीओ मैदानावर ‘पालकमंत्री चषक खो-खो’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत विदर्भातील पुरूष व महिला चमू सहभागी होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी मंळवारी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा जिल्हा खो-खो क्रीडापे्रमींच्या विशेष सहकार्याने आयोजित या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून २७ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता वर्धा जिल्हा खो-खो क्रीडाप्रेमी यांच्यावतीने जनजागृती स्कूटर रॅली आयोजित केली आहे. या स्पर्धेत विदर्भातील नामवंत १२ पुरूष व आठ महिला संघ सहभाग घेणार आहेत. स्पर्धांचे उद्घाटन २९ डिसेंबर २०१७ रोजी होणार आहे. तत्पूर्वी क्रीडा ज्योत रॅली आयोजित केली आहे. ज्यामध्ये सर्व पुरूष व महिला संघातील खेळाडू, इतर क्रीडा क्षेत्रातील खेळाडू एनसीसी, एनएसएस तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग घेतली.
रॅलीला पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, वर्धेच्या उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर हिरवी झेंडी दाखवतील. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करून ही रॅली उद्घाटनस्थळी पोहोचणार आहे
स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषद सदस्य अनिल सोले यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खा. रामदास तडस तर प्रमुख अतिथी म्हणून ना. मदन येरावार, आ. डॉ. पंकज भोयर, नितेश भांगडिया, जि.प अध्यक्ष नितीन मडावी, माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष राजेश बकाणे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित राहतील.
२० डिसेंबर २०१७ रोजी माजी खासदार विजय मुडे, सुरेश वाघमारे, डॉ. चंद्रशेखर खडसे, यशवंत झाडे, दीपिका आडेपवार, संतोषसिंह ठाकूर, माधव कोटस्थाने, जयंत कावळे, त्रिवेणी कुत्तरमारे यांच्याहस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला सकाळी १० वाजता क्रीडा जीवन गौरव सोहळा प्रशांत इंगळे, अविनाश देव, प्रशांत बुर्ले, सुधीर पांगुळ व प्रवीण हिवरे यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण नगरविकास मंत्री यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला भाजपा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपा महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्यसह क्रीडा व युवा सेवा विभाग नागपूरचे उपसंचालक सुभाष रेवतकर तसेच अतिथी उपस्थित राहतील. स्पर्धेच्या प्रत्येक सत्रामध्ये प्रत्येक दिवशी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य केलेल्या ४५ माजी खेळाडू, प्रशिक्षक, पालक व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा जीवन गौरव सन्मान देवून सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेतील सामने बघण्याकरिता व खेळाडूंचा उत्साह वाढविण्याकरिता क्रीडा प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्यासह उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला बांधकाम सभापती निलेश किटे, आरोग्य व शिक्षण सभापती श्रेया देशमुख, विदर्भ खो-खो असासिएशनचे संजय इंगळे, भाजपाचे वर्धा पालिका गटनेता प्रदीप ठाकरे, राकाँचे गटनेता सोनल ठाकरे, खो-खो असोसिएशनचे कैलाश बाकडे यांची उपस्थिती होती.
क्रीडा क्षेत्राच्या विकासाकरिता १० लाख
वर्धा पालिकेत क्रीडा क्षेत्राचा विकास करण्याकरिता आतापर्यंत २० हजार रुपयांची तरतूद होती. ती आता वाढवून थेट १० लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. या रकमेतून असे मोठे आयोजन नेहमीच होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी दिली.