वर्धा पोलिसांची दिल्लीत कारवाई; कॉलसेंटरचा गोरखधंदा उधळला, दोघांना अटक

By चैतन्य जोशी | Published: September 9, 2023 04:42 PM2023-09-09T16:42:49+5:302023-09-09T16:43:05+5:30

२ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

Wardha Police action in Delhi; Call center scam busted, two arrested | वर्धा पोलिसांची दिल्लीत कारवाई; कॉलसेंटरचा गोरखधंदा उधळला, दोघांना अटक

वर्धा पोलिसांची दिल्लीत कारवाई; कॉलसेंटरचा गोरखधंदा उधळला, दोघांना अटक

googlenewsNext

वर्धा : एअरलाईन्समध्ये नोकरी, खोटे क्रेडीट कार्डसह खोटे लोन देण्याचे आमिष दाखवून कॉल सेंटरच्या माध्यामातून नागरिकांना गंडा घालण्याचा गोरखधंदा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या निर्देशानुसार उधळण्यात आला. वर्धा पोलिसांनी बदरपूर साऊथ दिल्ली येथील उच्चभ्रु परिसरात सुरु असलेल्या दोन कॉलसेंटरवर कारवाई करुन फसवणुकीतील ८९ हजार रुपये रोख तसेच मोबाईल, सिमकार्ड असा एकूण २ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक केली. आकाश सुभाष सहानी (३०), राकेश रामप्रकाश राजपूत (३०) दोन्ही रा. बदरपूर दिल्ली अशी अटक आरोपींची नावे आहे.

वर्ध्यातील रहिवासी प्रांजली दिनेश चुलपार (१९) रा. बोरगाव मेघे हिने मोबाईलवर जॉब सर्च अपडेट नामक अॅप डाऊनलोड करुन त्यामधील फॉर्म भरला होता. ८ जून २०२३ रोजी तिला अज्ञाताने फोन करुन तुम्ही एअर इंडियात नोकरीसाठी अर्ज भरला होता त्यात तुमची निवड झाल्याचे सांगितले. प्रांजलीला विश्वासात घेऊन विविध मोबाईल क्रमांकावरुन फोन करीत फॉर्म भरण्यासाठी, जाॅयनिंग लेटर, शुल्क भरावे लागतील असे सांगून ८९ हजार ५०० रुपये फोन पे वरुन विक्रम मल्होत्रा या आयडीवर भरण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबतची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात दाखल केली.

गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी गुन्ह्यात बारकाईने तपास करण्यासाठी तसेच नागरिकांना लुबाडणाऱ्या बनावट कॉलसेंटरची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी सायबर पोलिस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक तपासानंतर हा गुन्हा फरिदाबाद हरियाणा व बदरपूर, साऊथ दिल्ली भागातून झाल्याचे प्रथमिक तपासात दिसून आले. तत्काळ पोलिस उपनिरीक्षक सिनूकुमार बानोत, कुलदीप टांकसाळे, निलेश तेलरांधे, अमीत शुक्ला, अनुप कावळे यांना दिल्ली येथे तपासाला पाठविले.

पोलिसांनी सतत सात दिवस शोध घेऊन अखेर साऊथ दिल्लीतील बदरपूर परिसरातील उच्चभ्रु परिसरात सुरु असलेल्या दोन बनावट कॉलसेंटरवर छापा मारुन दोघांना अटक केली. ही संपूर्ण कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. नागरिकांनी अशा बनावट कॉल्स पासून सावध राहावे, तरुण पिढीने सतर्क राहवे, जेणेकरुन फसवणूक होणरा नाही, असे आवाहन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.

देशातील विविध राज्यातील गुन्हे होणार उघड

मुख्य आरोपींसह सात महिला दिल्लीतील बदरपूर परिसरात असलेल्या दोन माळ्याच्या इमारतीत पहिल्या माळ्यावरुन बनावट कॉलसेंटर चालवित होते. पहिल्या माळ्यावर ईझीगो कंपनीच्या आत अनेक महिला व पुरुष लोन, जॉब फ्राॅड, क्रेडीट कार्ड या कारणाने त्यांना दिलेल्या यादीप्रमाणे फोन करुन रक्कम जमा करण्यास सांगत असल्याचे दिसले. पोलिसांनी आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी देशातील पंजाब, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आदी विविध राज्यातील जवळपास ५० ते ६० नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे विविध राज्यात घडलेले ऑनलाईन फ्राॅडचे गुन्हे उघड होणार असून संबंधित सर्व पोलिस ठाण्यांना याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी सांगितले.

आरापींच्या बँक खात्यात ६ लाखांवर फसवणुकीची रक्कम

आरोपींना पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी लोकांची फसवणूक करीत असल्याचे कबूल केले. पोलिस तपासात आरोपींच्या तीन विविध बँक खात्यात फसवणुकीतील जवळपास ६ लाख ६० हजारांवर रक्कम असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.

Web Title: Wardha Police action in Delhi; Call center scam busted, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.