पुरूष गटात नागपूर रेंज तर महिलांत वर्धा पोलिसांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 11:57 PM2018-02-06T23:57:35+5:302018-02-06T23:59:14+5:30
येथील जागृती क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार डॉ. शरद काळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम पारितोषिक नागपूर रेंज पोलिसांच्या चमूने तर महिला गटाचे प्रथम पारितोषिक वर्धा पोलीस चमूने पटकावले.
ऑनलाईन लोकमत
आर्वी : येथील जागृती क्रीडा मंडळाच्यावतीने आमदार डॉ. शरद काळे याच्या स्मृतीप्रित्यर्थ तीन दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित होती. या स्पर्धेच्या पुरूष गटात प्रथम पारितोषिक नागपूर रेंज पोलिसांच्या चमूने तर महिला गटाचे प्रथम पारितोषिक वर्धा पोलीस चमूने पटकावले. राजीव गांधी स्टेडियमवर आयोजित या स्पर्धेचा समारोप रविवारी झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे हे होते, तर महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे, रिसोडचे आ. अमित झणक, वर्धा जिल्हा अॅम्युचर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष नागोराव लोडे, माजी नगरसेवक प्रा. पंकज वाघमारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष कलावती वाकोडकर, जि.प. सदस्य मुकेश कराळे, अरूण बाजारे, संगीता खेकाडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी माणिकराव ठाकरे यांनी मैदानी खेळाच्या स्पर्धेच्या आयोजनातून समाजात खेळभावना तर वाढतेच शिवाय देशी खेळाची आवड सुद्धा निर्माण होते, असे सांगून स्व. आमदार डॉ. शरद काळे यांची आठवण करून स्मृती जागृत केल्या. स्पर्धेच्या आयोजनातील सातत्य कायम ठेवण्याचे खेळाचे महत्त्व विषद केले. आ. अमर काळे यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या व स्पर्धेला प्रतिसाद देवून उत्साह वाढविणाºया प्रेक्षकांच व सहकार्य करणाºयांचे आभार मानले.
या स्पर्धेच्या पुरूष गटात २० चमुंनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या प्रथम क्रमांकाचे रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर नागपूर येथील एकलव्य क्रीडा मंडळाच्या उपविजेत्या चमूला द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. तर महिला गटात सहा चमूंनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या ठरलेल्या वर्धा पोलीस चमूला प्रथम पारितोषिक तर उपविजेत्या ठरलेल्या नागपूर सिटी पोलीस चमूला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक व स्मृतीचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्व. आमदार डॉ. शरदराव काळे स्मृती प्रित्यर्थ राज्यस्तरीय पुरूष व महिला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, बुलढाणा येथील विधानसभा सदस्य हर्षवर्धन सपकाळ, सोलापुरच्या विधानसभा सदस्य प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते.