वर्धा- माजी सैनिकाच्या अवमानाचा निषेध, नगर परिषदेसमोर धरणं आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 02:50 PM2018-04-02T14:50:24+5:302018-04-02T14:50:24+5:30
सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली.
वर्धा : येथील सेवानिवृत्त कर्नल चित्तरंजन चवडे यांना वर्धा न. प. तील एका कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी भारतीय माजी सैनिक संघाच्यावतीने स्थानिक न.प.च्या कार्यालयासमोर धरणे देत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनादरम्यान मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
माजी सैनिकाला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या न.प. कर्मचाऱ्यावर प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी व माजी सैनिकांचा अपमान होणे ही निंदनिय बाब असून न.प.च्या मुख्याधिकाºयांनी माजी सैनिकांची जाहीर माफी मागावी या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता माजी सैनिकांनी वर्धा नगर परिषदेच्या कार्यालयावर धडक देत न.प. प्रशासनाच्या माजी सैनिक विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी न.प. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी आपल्या चमुसह न.प. कार्यालय गाठले. यावेळी पोलीस कर्मचाºयांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा केली. मात्र, आंदोलनकर्ते मुख्याधिकाऱ्यांची भेटून चर्चा केल्याशिवाय जाणार नाही यावर ठाम राहिले. त्यानंतर ११.३० वाजताच्या सुमारास आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत घडलेल्या प्रकार निंदनिय असल्याचे मान्य करीत न.प. प्रशासनाच्यावतीने माजी कर्नल चिंत्तरंजन चवडे यांच्यासह सर्व माजी सैनिकांची जाहीर माफी मागीतली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनात माजी कर्नल चित्तरंजन चवडे, माजी सैनिक श्याम परसोडकर, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने माजी सैनिक व वीर माता, पत्नी सहभागी झाल्या होत्या.