वर्धा रेल्वेस्थानक होणार जागतिक दर्जाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 10:41 PM2019-01-17T22:41:28+5:302019-01-17T22:42:20+5:30
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसाठी सुखावह ठरणार आहे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
मध्य रेल्वेच्या नागपूर परिमंडळच्यावतीने वर्धा रेल्वेस्थानक पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत खासदार तडस यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, रेल्वे प्रबंधक सोमेश कुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक के.के. मिश्रा, नगरपरिषदचे उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य मदन चावरे, पंचायत समिती सभापती महानंदा ताकसांडे, नगरपरिषदचे पाणी पुरवठा सभापती बंटी गोसावी, नगरसेविका वंदना भुते, नगरसेवक निलेश किटे, कैलास राखडे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना खा. तडस म्हणाले, महाराष्ट्रातील सहा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. या रेल्वेस्थानकाला महात्मा गांधी यांचे नाव देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्धा रेल्वेस्थानक जागतिक दर्जाचे होणार असल्याने जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे. परंतु यासोबतच स्थानकाची देखभाल करणे हे सुध्दा महत्त्वाचे आहे. यासाठी रेल्वे मंडळाचे प्रयत्न करावे, अशा सूचना यावेळी आ.डॉ.पंकज भोयर यांनी केल्यात. यावेळी रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
रेल्वेस्थानकाचा २१ कोटींतून होणार कायापालट
महाराष्ट्रातील ६ स्थानकाला जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी मान्यता दिली असून यामध्ये वर्धा स्थानकाचा समावेश करण्यात आलेला आहे. जागतिक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्यासाठी नविन इमारत, बुकींग, आरक्षण केंद्राचे बांधकाम, सहा मीटर रुंदीचा लिप्टसह पुल तयार करण्यात येणार आहे. तसेच सध्या असलेल्या पुलाला लिप्ट सुरु करण्यात येणार आहे. नविन पोलिस स्टेशन इमारत, फलाटचे बांधकाम आणि फलाटावर नविन शेड तयार करणे इत्यादी कामे होणार आहे. याकरिता २१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे सोमेश कुमार यांनी प्रास्ताविकात सांगितले आहे.