पावसाची संततधार, नदी-नाले तुडुंब; नांद धरणाचे ७, तर लाल नाला प्रकल्पाचे ५ दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 10:06 AM2024-07-20T10:06:57+5:302024-07-20T10:07:52+5:30
हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजलसरा रोडवरील पुलाला खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली आहे.
वर्धा - पावसाने दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याला तडाखा दिला. शनिवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले तुडुंब भरले आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नांद (ता. उमरेड, जि. नागपूर) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी सकाळी धरणात येणाऱ्या येव्यानुसार व आवश्यकतेप्रमाणे धरणाचे ७ दरवाजे ३५ से.मी.ने उघडुन धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी आपल्या स्वता:सह कुटूंबीयांची व इतर नागरीकांच्या जान, मालाची व जनावरांची योग्य ती खबरदारी घ्यावी. कुठल्याही परिस्थितीत कुणीही नदी पात्र ओलांडू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाणात वाढ झाल्यामुळे लाल नाला प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत आहे. ROS नुसार जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरीता शनिवारी सकाळी ९:०० वाजता लाल नाला धरणाचे ५ दरवाजे ०५ से.मी.ने उघण्यात आले. विसर्ग १२.१२ घनमीटर प्रती सेकंद सोडण्यात येत आहे. लाल नाला, पोथरा नदी, वर्धा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
शनिवारी सकाळी पोथरा धरण हे ८५ टक्के भरलेले आहे. ते आज १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठील गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजलसरा रोडवरील पुलाला खड्डा पडला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देण्यात आली आहे.