वर्धा नदीपात्राला कोरड; डोहानेही गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 10:25 PM2019-04-28T22:25:42+5:302019-04-28T22:26:16+5:30
वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे. त्यामुळे देवळी शहराचा पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.
देवळी शहराला अंदोरी येथील वर्धानदीवरुन पाणीपुरवठा केल्या जातो. पण, नदी कोरडी झाल्याने शहरातील पाणी समस्या लक्षात घेताच नगरपालिकेने नदीपात्रातील डोहाचे खोलीकरण सुरु केले आहे. देवळीकरांच्या घशाला कोरड पडण्यापूर्वीच पाण्याची सोय करण्याकरिता जेसीबी व मजुरांच्या सहाय्याने कामाला गती दिली आहे. डोह असलेल्या भागात खोलीकरण करून यातील पाणी एका नालीव्दारे पालिकेच्या जलकुंभापर्यंत पोहोचविले जात आहे. एप्रिलमहिन्यातच ही भयावह स्थिती असल्याने मे महिन्यात याही पेक्षा पाण्याची भिषणता जानवणार आहेत. त्यामुळे वेळीच धोका ओळखून पालिकेने खोलीकरणाकरिता धडपड चालविली आहे. नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रा. नरेंद्र मदनकर यांच्या देखरेखीत गेल्या दोन दिवसांपासून खोलीकरण केले जात आहे. मागील काही वर्षाचे तुलनेत यावर्षी देवळी तालुक्यातील गावात पाणी टंचाईची भिषणता मोठ्या प्रमाणात आवासून उभी ठाकली आहे. विहिरीही अखेरच्या घटका मोजत असल्याने गावातील नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. ग्रामीण भागातील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्याकरिता पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
पात्रातील जलकुंभ पडला उघडा
शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्चुन नविन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. अंदोरीच्या वर्धा नदीपात्रात असेलेल्या डोहाचे पाणी पालिकेच्या जलकुंभात साठवून शहराला पाणीपुरवठा केल्या जात आहे. पण पाण्याचे वाढते बाष्पीभवन आणि निम्न वर्धा जलाशयातून पाणी न सोडल्यामुळे या नदीपात्रातील पाण्याची धार बंद झाली आहे. सध्या नदीपात्रात मातीचा व वाळूचा गाळ साचलेला दिसून येतो. वाहते पाणी नसल्याने नदीतील डोह उघडा पडून आटण्याची शक्यता बळावली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे जलकुंभ याआधी नदी पात्राच्या पाण्यात बुडलेला राहायचा. मात्र सद्यस्थितीत हा जलकुंभ घडला पडला आहे.