लाळखुरकुत लसीकरणात ‘वर्धा’ द्वितीय स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 11:44 PM2019-05-08T23:44:12+5:302019-05-08T23:44:42+5:30
जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणाऱ्या ‘लाळखुरकुत’ या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. जनावरांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाने सध्या राज्यात १४ वी तर देशात २५ वी लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी करणाऱ्या ‘लाळखुरकुत’ या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. जनावरांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाने सध्या राज्यात १४ वी तर देशात २५ वी लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम २० मे पर्यंत राबविली जाणार असून या मोहिमेत दरम्यान उल्लेखनिय कार्य करीत वर्धा जिल्ह्याने विदर्भात द्वितीय स्थान पटकाविले आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात सदर लसीकरणाचे काम ६३.०६ टक्के झाले आहे.
लाळखुरकुत हा आजार विषाणू जन्य असून या आजाराची लागण झालेल्या जनावरांची कार्यक्षम शक्ती कमी होते. हा आजार पशुपालन व्यवसाय करणाऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा असल्याने त्याला आळा घालणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्याच अनुषंगाने सध्या लाळखुरकुतची प्रतिबंधात्मक लस गाय व म्हैस वर्गीय जनावरांना दिली जात आहे. वर्धा जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ७२ पशुधन आहे.
ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्याला ३ लाख ५० हजार ५०० लस मात्रा प्राप्त झाली. सध्या हिच प्रतिबंधात्मक लस जनावरांना दिली जात आहे. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील एकूण २ लाख १५ हजार ६५७ गाय व म्हैस वर्गीय जनावरांना ही लस देण्यात आली आहे. तर विदर्भात अव्वल असलेल्या गोंदीया जिल्ह्यातील ४ लाख २५ हजार ६४६ पशुधनापैकी २ लाख ७४ हजार ९२३ जनावरांना लाळखुरकुतीची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. रोग अन्वेशन विभाग पुणेचे उपायुक्त डॉ. पी.आर. महाजन, नागपूरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहा. आयुक्त किशोर कुमरे यांच्या मार्गदर्शनात सध्यास्थितीत गोंदीया जिल्ह्याने लसीकरण मोहिमेचे ६७ टक्के तर वर्धा जिल्ह्याने ६३.०६ टक्के काम झाल्याचे सांगण्यात आले.
लाळखुरकुत प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत गोंदिया प्रथम तर वर्धा विदर्भात द्वितीय स्थानी आहे. सध्या जिल्ह्यातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातून गाय व म्हैस वर्गीय जनावरांना नाममात्र शुल्कावर लाळखुरकुतीची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. ही मोहीम २१ मे पर्यंत सुरू राहणार असून याचा लाभ पशुपालकांनी घ्यावा.
- प्रज्ञा गुल्हाणे, पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.