वर्धा : मेगा ब्लॉकमुळे खोळंबली दक्षिणेकडील रेल्वे वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 04:14 PM2019-02-16T16:14:35+5:302019-02-16T16:15:03+5:30
रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेवरून शनिवारी (16 फेब्रुवारी) एक तासाचा मेगाब्लॉक निश्चित करून भुगाव नजीक दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
वर्धा : रेल्वेच्या तांत्रिक विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सूचनेवरून शनिवारी (16 फेब्रुवारी) एक तासाचा मेगाब्लॉक निश्चित करून भुगाव नजीक दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. परिणामी, सेवाग्राम रेल्वे स्थानक होत दक्षिणेकडे जाणा-या आणि दक्षिणेकडून नागपूरकडे येणा-या बहुतांश रेल्वे गाड्या कमीत कमी १५ ते जास्तीत जास्त ३० मिनिटांनी उशिरा सोडण्यात आल्या. एकूणच या मेगा ब्लॉकमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती.
रेल्वे विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेवाग्राम-चंद्रपूर या रेल्वे मार्गावर काही ठिकाणी दुरूस्तीची गरज असल्याचे लक्षात येताच ते काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याच अनुषंगाने शनिवारी रेल्वे विभागाच्या स्थानिक अधिका-यांना कुठलीही पूर्व सूचना न देता अचानक हा मेगा ब्लॉक लाऊन क्रेनच्या सहाय्याने ब्रिज गडर बदलविणे आणि इतर काम करण्यात आले. दुपारी १.४५ ते २.४५ या वेळेत हा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर खोळंबलेली रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी मेगा ब्लॉकच्या नंतरही काम सुरू होते अशी चर्चा रेल्वे विभागातील कर्मचा-यांमध्ये होत होती.
जनसंपर्क अधिका-यांचा प्रतिसाद नाहीच
भुगाव येथील कामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉक प्रकरणी अधिकची माहिती जाणून घेण्यासह रेल्वे प्रशासनाची अधिकृत बाजू जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वे विभागाचे नागपूर येथील जनसंपर्क अधिकारी अनिल वालदे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.