Corona Virus in Wardha; विलगीकरणात राहणाऱ्यांसाठी वर्ध्यातील विद्यार्थ्याने तयार केलं संकेतस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 07:40 PM2020-03-27T19:40:45+5:302020-03-27T19:44:33+5:30
कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: करोनामुळे विलगीकरणात बंदिस्त झालेल्यांना विरंगुळा म्हणून शालेय विद्यार्थ्याने तयार केलेले संकेतस्थळ देशविदेशात लोकप्रिय ठरू लागले आहे. विदेशातून किंवा परप्रांतातून आलेल्यांना शासकीय किंवा गृह विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. चौदा दिवसाचे संपर्कविहीन वास्तव्य अनेकांसाठी अस्वस्थ करणारे ठरते. या एकांतवासाला गृह विलगीकरणात थोडाबहुत कुटूंबियाच्या सहवासाचा दिलासा असतो. मात्र कठोर विलगीकरणात हा एकांतवास कष्टदायी ठरत असल्याची कानावर आलेली चर्चा एका दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करणारी ठरली.
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप श्रीवास्तव यांचा मुलगा व विद्यानिकेतनचा विद्यार्थी असलेल्या प्रखर श्रीवास्तवने कुटूंबात व नातलग मंडळीत विलगीकरणावर चर्चा ऐकल्यानंतर काहीतरी करण्याचे निश्चित केले. असे एकटेपण वाट्याला आलेल्यांसाठी विरंगुळ्याचे साधन म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे त्याने ठरवले. दोनच दिवसापूर्वी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रिलॅक्स इन क्वॉरेनटाईन डॉट कॉम हे संकेतस्थळ तयार झाले.
हे व्यासपीठ एका पृष्ठावर स्वतंत्रपणे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध करते. व्यक्तींना त्याद्वारे योग्यप्रकारे वेळ घालवता येतो. नवनव्या बातम्या उपलब्ध असतात. विविध छंद जोपासता येतात. संगीत, विनोदी खेळ, समुपदेशन, ध्यान साधना करण्याचे तंत्र उपलब्ध आहे. याच माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना जोडता येते. वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे याचेही मार्गदर्शन मिळते.
विशेष म्हणजे न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकते. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांशी बोलतात. अनेक समूह या स्थळावर दोनच दिवसात निर्माण झाले आहेत. इतक्या कमी कालावधीत दोन हजार व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिली असून आयर्लंड, स्पेन, इंग्लंडसह भारतातील व्यक्तींनी या स्थळाचा अनुभव घेणे सुरू केले आहे.
प्रखर श्रीवास्तवला याविषयी विचारणा केल्यावर तो म्हणाला की दोन आठवडे एकटे राहावे लागत असल्याचे ऐकायला मिळाल्यावर मला विचित्रच वाटले. अशा लोकांसाठी काही करता येईल कां म्हणून वडिलांना विचारणा केली. त्यांचे मार्गदर्शन मिळाले, पण या संकेतस्थळावर नवीन काही असावे म्हणून मी केलेल्या प्रयत्नाला पावती मिळाली. लोकांचा प्रतिसाद पाहून त्यात नवी भर टाकण्याचा विचार करीत आहे.