वर्धा येथे आहे वृक्षांची माहिती देणारे अनोखे वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 07:10 AM2021-06-20T07:10:00+5:302021-06-20T07:10:01+5:30

Wardha news वर्ध्यातील आयटीआयच्या ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून नंदनवन फुलविले. येथे झाडांविषयी माहिती देणारे सार्वजनिक वाचनालय आकारास आले असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

At Wardha there is a unique library providing information about trees | वर्धा येथे आहे वृक्षांची माहिती देणारे अनोखे वाचनालय

वर्धा येथे आहे वृक्षांची माहिती देणारे अनोखे वाचनालय

Next
ठळक मुद्देनिसर्ग सेवा समितीने ओसाड टेकडीवर फुलविले नंदनवन

 लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या निसर्ग सेवा समितीने मागील २१ वर्षांपासून वर्ध्यातील आयटीआयच्या ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून नंदनवन फुलविले. या परिसराचे ऑक्सिजन पार्क, निसर्ग हिल्स असे नामकरण करण्यात आले आहे. येथे झाडांविषयी माहिती देणारे सार्वजनिक वाचनालय आकारास आले असून ऑक्सिजन पार्कमधील विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती फलकांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.

दहा ते बारा एकर परिसरात असलेल्या आयटीआय टेकडीवर वड, पिंपळ, बेल, उंबर आवकाळा, कडुनिंब, अमलताश, जांभूळ, बेहडा, रिठा, कदंब यासारख्या दीर्घायुषी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांचे संवर्धनही केले जात आहे. या वृक्ष चळवळीला वर्धेकरांसह लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचेही सहकार्य लाभत असल्याने टेकडीवर आज चांगलीच हिरवळ दाटली आहे. येथे मनुष्याच्या जीवनातील मौलिक प्रसंगांच्या अनुषंगाने वृक्षलागवड केली जाते. यात स्मृतिवृक्ष, वाढदिवस वृक्ष, गृहप्रवेश किंवा एक घर एक वृक्ष, विवाह वृक्ष, षष्ठ्यब्दीपूर्ती वृक्ष आणि नूतन वर्षाभिनंदन वृक्ष लावण्यात आले आहेत. विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आल्याने हिरवागार झालेला हा परिसर वर्धेकरांना खुणावत आहे. या परिसरात नव्याने झाडांचे वाचनालय आकार घेत असून त्यात विविध प्रजातींच्या वृक्षांची विस्तृत माहिती विशद करणारे फलक लावले जाणार आहेत. भावी पिढीकरिता ते प्रेरणादायी ठरणार आहे.

असे असेल झाडांचे वाचनालय

वृक्षलागवड व संवर्धन तसेच पर्यावरणासंदर्भातील जनजागृती, जैवविविधतेचे संवर्धन, विद्यार्थी-शिक्षकांना पर्यावरण शिक्षणाचा केंद्रबिंदू समजून अभ्यासाकरिता उपयुक्त प्रशिक्षण, साहित्याचे प्रकाशन, व्याख्यान, स्लाईड शो, फिल्म्स, मुलाखती, कार्यशाळा, वनौषधी तसेच इतर वनोपज देणाऱ्या वनस्पतींची लागवड, मृदा व जलसंवर्धनाकरिता तांत्रिक व कृतिशील मार्गदर्शन, अपारंपरिक ऊर्जा, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, विघटन होणाऱ्या जैविक कचऱ्याचे निर्मूलन, पर्यावरणपूरक जीवनशैली, सणोत्सव, दिनविशेष, भूभागातील नैसर्गिक स्रोत, वृक्षवेली, औषधी वनस्पती, त्यांचे जतन, निसर्ग निरीक्षण, पर्यावरणीय प्रश्न सोडविण्याकरिता विविध शैक्षणिक साधनांचा तसेच अत्याधुनिक तंत्राचा वापर करून शिक्षक, विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण, चित्र, कथा, निबंध लेखन, निसर्गगीते, भित्तीपत्रक, घोषवाक्य आदी उपक्रम या वाचनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत.

वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी निसर्ग सेवा समितीच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून वृक्षलागवडीची चळवळ राबविली जात आहे. वर्धेकर, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून आज टेकडीवर लागवड करण्यात आलेल्या विविध प्रजातींच्या वृक्षांमुळे परिसर हिरवागार झाला आहे. आता वृक्षांविषयी विस्तृत माहिती विषद करणारे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. हे वाचनालय भावी पिढीकरिता अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

- मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष, निसर्ग सेवा समिती, वर्धा

Web Title: At Wardha there is a unique library providing information about trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.