तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच.. प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 06:21 PM2022-06-02T18:21:07+5:302022-06-02T18:26:33+5:30
पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते ते बघतोच, अशी धमकी देऊन ते वारंवार पैशाची मागणी करायचे.
वर्धा : प्रेयसीच्या सततच्या धमकीने धास्तावलेल्या प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मृताच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तुझे लग्न दुसरीकडे कसे होते पाहतेच, तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन... अशी धमकी प्रेयसीकडून व तिच्या सहकाऱ्याकडून मिळत होती. या सततच्या जाचाला कंटाळून आशिष नरेश भोपळे, रा. विरुळ आकाजी याने मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
मृत आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर, रा. कृष्णापूर, ता. आर्वी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते मी बघतो, अशी धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी करायचे. त्यांनी आशिषला तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे देण्यास नकार दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवे ठार मारून तुला पोलीस केसमध्ये फसवीन, अशी धमकी देऊ लागले.
प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळे याने मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले. त्याच्याजवळील चिठ्ठीत त्याने हे सर्व नमूद केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आल्याने मृत आशिषची आई सुनंदा भोपळे यांनी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पारबता कुंभेकर आणि तिलक साटोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.