वर्धेकरांना नीलपंखच्या शिल्पाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:06 PM2019-08-21T22:06:35+5:302019-08-21T22:08:14+5:30
वर्षभरापूर्वी याच दिवशी २२ आॅगस्ट रोजी वर्ध्याच्या शहरपक्षी म्हणून भारतीय नीलपंख पक्ष्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. या शहर पक्ष्यांची निवड बहुसंख्य वर्धेकरांनी मतदान प्रक्रियेव्दारे केली असल्यामुळे नीलपंख पक्ष्याचे आकर्षक शिल्प शहरातील धुनिवाले चौकात स्थापित करण्याची मागणी बहार नेचर तर्फे करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्षभरापूर्वी याच दिवशी २२ आॅगस्ट रोजी वर्ध्याच्या शहरपक्षी म्हणून भारतीय नीलपंख पक्ष्याच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. या शहर पक्ष्यांची निवड बहुसंख्य वर्धेकरांनी मतदान प्रक्रियेव्दारे केली असल्यामुळे नीलपंख पक्ष्याचे आकर्षक शिल्प शहरातील धुनिवाले चौकात स्थापित करण्याची मागणी बहार नेचर तर्फे करण्यात आली होती. नगर परिषदेने या मागणीला मंजुरीही दिली होती, मात्र वर्षभरानंतरही ही मागणी अद्याप प्रलंबित आहे.
शहरपक्षी निवडण्याकरिता वर्धा नगर परिषद आणि बहार नेचर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून ते १५ आॅगस्ट २०१८ या काळात शहरपक्षी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये तांबट, धीवर, नीलपंख, कापशी घार व पिंगळे हे पाच पक्षी उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात होते. तब्बल ५४ दिवस चाललेल्या या निवडणुकीत शहरातील ५१ हजार २६७ विद्यार्थी व नागरिकांनी मतदान केले होते. २२ आॅगस्ट रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयात मतमोजणी करण्यात आली. २२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने वर्धेकरांनी नीलपंख या पक्ष्याला निवडून दिले होते. प्रख्यात पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी अनेक पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत या पक्षाच्या निवडीची रीतसर घोषणा केली होती. यावेळी नीलपंखचे आकर्षक शिल्प धुनिवाले चौकात स्थापित करण्याचेही जाहीर करण्यात आले होते.
धुनिवाले चौकातील शिल्पात हवा बदल
धुनिवाले चौकाचे सौंदर्यीकरण करून चौकात मध्यभागी एक मशाल व तीन मोरांचे शिल्प ठेवण्यात आले आहे. या शिल्परचनेत बदल करून एक मोर शिल्प कायम ठेवून राज्यपक्षी हरियाल व शहरपक्षी नीलपंख यांचा या शिल्पात समावेश करावा, अशी मागणी नालवाडी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
महात्मा गांधी चौक ते इंदिरा गांधी चौक या रस्त्याच्या दुतर्फा विविध पक्ष्यांची माहिती देणारे तसेच जैवविविधता दर्शविणारे फलक लावावे आणि शहरात प्रवेश करणाऱ्या प्रवेशद्वारावर भारतीय नीलपंखाचा समावेश करावा.
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत विस्तारीकरण व सौंदर्यीकरणाचे काम सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात आता नीलपंख पक्ष्याचे शिल्प उभारावे, अशी मागणी बहार नेचर फाऊंडेशनने केली आहे.