वरातीने वाढविली वर्ध्याची चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:02+5:30
जिल्हा प्रशासनानात उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) म्हणून काम सांभाळणारे ५५ वर्षीय हे अधिकारी कुटुंबीयांना आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी धुळे येथे गेले होते. वर्धेत ४ जुलैला परतल्यावर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन केले होते. याच क्वारंटाईन कालावधीत त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या पिपरी (मेघे) येथील लग्नसोहळ्याने कोरोना रुग्ण संख्या वाढली लागली असून दोन दिवसात या सोहळ्याशी संबंधित सात व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. शनिवारी जिल्हा प्रशासनातील बडे अधिकारी असलेले उपजिल्हाधिकारी, प्रसुतीसाठी अकोला येथून वर्धेत परतलेली एक गर्भवती महिलेला, पिपरी (मेघे) येथील लग्नात सहभागी झालेल्या वधुच्या दोन मैत्रिणी तसेच आर्वीच्या नेताजी वॉर्ड येथील एक व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा प्रशासनानात उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) म्हणून काम सांभाळणारे ५५ वर्षीय हे अधिकारी कुटुंबीयांना आणण्यासाठी काही दिवसांपूर्वी मूळ गावी धुळे येथे गेले होते. वर्धेत ४ जुलैला परतल्यावर त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाईन केले होते. याच क्वारंटाईन कालावधीत त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे. हे उपजिल्हाधिकारी वर्धा शहराच्या शेजारील नालवाडीच्या पाटीलनगर भागात राहत असल्याने या परिसराला कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, तालुका अधिकारी माधुरी बोरकर, गटविकास अधिकारी स्वाती इसाये, ग्रामविकास अधिकारी प्रमोद बिडवाईक, आरोग्य सेवक संजय डफळे आदींनी या परिसराची पाहणी केली. कोरोना संसर्ग झालेल्या सदर उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निकट संपर्कात तीन व्यक्ती आल्यने त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर उपजिल्हाधिकाºयांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर वर्धा शहरातील हनुमाननगर येथे गर्भवती महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे.
सदर २७ वर्षीय महिला १० दिवसांपूर्वी प्रसूतीसाठी अकोला येथून वर्धा शहरातील हनुमाननगर येथे तिच्या आईकडे आली. काही कारणांमुळे तिला सावंगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच ठिकाणी तिचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आज कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना बाधित व्यक्तीची माहिती वर्ध्याच्या आरोग्य विभागाने अकोला जिल्हा प्रशासनाला कळविली आहे.
आर्वीतील संख्या वाढतीवरच, नेताजी वॉर्डही झाला सील
आर्वी शहरातील नेताजी वॉर्ड येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय पुरुषाची प्रकृती बिघडल्याने त्याला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्याचे स्वॅब घेऊन ते तपासले असता या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे पुढे आले. सदर व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय आर्वीचा नेताजी वॉर्ड परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे.