वर्ध्याच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश तर आला; पण रक्कम नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 11:47 IST2018-02-06T11:46:48+5:302018-02-06T11:47:48+5:30
कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.

वर्ध्याच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश तर आला; पण रक्कम नाही
रूपेश खैरी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंमलात आली तेव्हापासून सुरू झालेला गोंधळ आजही कायम आहे. कर्जमाफी झाल्याचा संदेश शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आला. मात्र बँकेत जाऊन चौकशी केली असता खात्यात रक्कमच जमा नसल्याचा अजब प्रकार समोर येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील वायफड येथील शेतकरी अनिल लक्ष्मणराव चरडे यांच्यासोबत असाच प्रकार घडला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पत्रव्यवहार केला; परंतु मोबाईलवर कर्जमाफीचा संदेश आल्यानंतर त्यांनी लगेच कर्जाची उचल केलेल्या वायफड येथील बँक आॅफ बडोदाची शाखा गाठून चौकशी केली. मात्र तिथे त्यांच्या खात्यात कुठलीच रक्कम जमा झाली नसल्याचे कळले. त्यांनी विचारणा केली असता प्रतीक्षा करा असे उत्तर मिळाले. याला दोन महिने होत आहेत.
चरडे यांनी १९ मे २०१६ रोजी ९० हजार रुपयांचे कर्ज उचलले होते. या कर्जावर व्याज चढून ते ९३ हजार रुपये झाले. कर्जमाफी योजनेची घोषणा होताच निर्देशानुसार अर्ज भरला. त्यात कोणतीही त्रुटी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्रुटी असलेल्या यादीत आपले नावही तपासले असता त्यात नाव नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना कर्जमाफी झाल्याचा संदेश आल्याने आपला सातबारा कोरा झाल्याचे स्वप्न रंगविणाऱ्या या शेतकऱ्यांवर बँकांचे आणि प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची वेळ आली आहे.
मग, कर्जमाफीचा संदेश कसा?
३१ मार्च २०१६ पर्यंतचेच कर्ज माफ करण्याचे आदेश बँकेला असताना १९ मे २०१६ रोजी कर्ज घेणाऱ्या या शेतकऱ्याला कर्जमाफी झाल्याचा संदेश कसा, असा नवा प्रश्न समोर येत आहे. कर्जमाफी राबविणाऱ्या यंत्रणेची ही चूक असेल तर अशी चूक शेतकऱ्याच्या जीवावर उठणारी ठरू शकते, याची जाणीव या यंत्रणेला नाही का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
३१ मार्च २०१६ पर्यतचे कर्ज माफ करण्याचे आदेश बँकांना आले आहेत हे खरे आहे. पण यानंतर कर्ज उचललेल्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा संदेश कसा आला हा संशोधनाचा विषय आहे. या शेतकऱ्याने जिल्हा बँकेशी संपर्क साधावा.
- वामन कोहाड, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.
असा प्रकार घडलेल्या शेतकऱ्याने आमच्याशी संपर्क साधावा. या संदर्भात काय गडबड झाली याची चौकशी करण्यात येईल. नियमानुसार संदेश आल्यानंतर ती रक्कम खात्यातून माफ होणे अनिवार्य आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी,
वर्धा