वर्ध्याची कोरोनाच्या लढ्यातील वाटचाल देशासाठी आयडियल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 05:20 PM2020-04-27T17:20:17+5:302020-04-27T17:22:41+5:30
प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुणित वर्ध्याच्या या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील केंद्रस्थान असलेल्या या भूमीतून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आताही कोरोनासारख्या महामारीच्या लढ्यात अद्याप ही भूमी सेफ झोन मध्ये ठेवण्यात यश आले आहे. याकरिता प्रशासनाने विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजना देशासाठी आयडीयल ठरल्या आहेत. याची दखल खुद्द सीएमओ आणि पीएमओंनी घेऊन यासारख्या उपाययोजना मेट्रोसिटीही राबवाव्या, असा संदेश दिला आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासून कंबर कसली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याचीही जाणीव ठेवून संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी देऊन सोशल डिस्टन्सिंगवर भर दिला आहे. गर्दी टाळण्याकरिता शहरातील एक मुख्य भाजीबाजार १८ ठिकाणी विभाजित केला आहे. तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करण्यात आल्याने याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत प्रशासनाला शाबासकी दिली. याही पुढे जात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार व उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या पुढाकारातून रोटरी क्लबच्या सहाय्याने केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर आदर्श भाजीबाजार साकारण्यात आला. हा भाजीबाजार युनिक ठरला असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याने वर्धा पुन्हा देशपातळीवर पोहोचले आहे.
मराठी चित्रपटांच्या नावातून जनजागृती
तुमच्या डार्लिंग सोबतच व्हिडिओ कॉलवरच बोला. विनाकारण प्रवास करणे टाळा. स्वत:ची काळजी घ्या भय•ाीत होऊ नका. नेहमी हात धुवा स्वच्छता राखा, काळजी घ्या आणि टकाटक राहा. थोडे दिवस पांघरुण घेऊन शांत झोपा. मुंबई-पुणे-मुंबई काही दिवस प्रवास नाही केला तरी चालेल. टपरीवर नको आता घरीच खारी बिस्कीट खा. जो काय टाइमपास करायचा ना तो घरी बसून करा. आता गच्चीच आपला हँग आऊट पॉइंट, अशाप्रकारे मराठी चित्रपटाच्या नावाने बाजाराच्या ठिकाणी फलक लावून जनजागृती केली जात आहे.
म्हणून युनिक ठरला भाजीबाजार
केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर रोटरी क्लबच्या सहकार्याने जवळपास ८० दुकानांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दुकानांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ग्राहकांना बसण्याकरिता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सावलीकरिता ग्रीन नेट टाकली असून सकाळी ९ ते दुपारी १ वाजतापर्यंत हा बाजार सुरू राहतो. या ठिकाणी हॅण्डवॉश, सॅनिटायझर तसेच सर्व दुकानदारांना एक किट दिली असून त्यात हॅण्डग्लोव्हज, सॅनिटायझर व कापडी पिशव्या दिल्या आहेत. मध्यभागी असलेल्या स्टेजवरून वेळोवळी सूचना दिल्या जातात. बाहेर रस्त्याच्या बाजूला वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असून महसूल विभाग, पोलीस प्रशासन, नगर पालिका व रोटरीचे पदाधिकारी येथे कार्यरत आहेत.
काय म्हणतात, पीएमओ...
वर्ध्यातील रोटरी क्लब आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आदर्श भाजीबाजार सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्धीस आला आहे. याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून त्यांच्या पीएमओ इंडिया रिपोर्ट कार्ड या फेसबूक अकाऊंटवर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यात महाराष्ट्रातील छोट्याशा शहरात सामाजिक अंतर राखत भाजीबाजाराची इतकी चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली, ती कौतुकास पात्र आहे. त्यामुळे या कोरोनाच्या महामारीत इतरही मेट्रोसिटीने आदर्श घेऊन सामाजिक अंतर राखावे असे म्हटले आहे.