प्लास्टिक मुक्तीच्या दिशेने वर्धेकरांचे भक्कम पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:13 PM2018-03-26T22:13:16+5:302018-03-26T22:13:16+5:30
राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर वर्धेकरांनी प्लास्टिक मुक्तीकरीता भक्कमपणे पाऊले टाकत याविषयीची व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानंतर वर्धेकरांनी प्लास्टिक मुक्तीकरीता भक्कमपणे पाऊले टाकत याविषयीची व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शहरातील लहान विक्रेत्यांकडे कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. येथून ग्राहकांना सामान खरेदी केल्यानंतर कापडी पिशवी खरेदी करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी महिला मंडळाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांची निर्मिती करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला. ही बाब लक्षात घेवून राज्यात प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता साहित्य खरेदी केल्यानंतर प्लास्टिक पिशव्यांमधून सामान आणण्याच्या कार्यक्रमाला पूर्णपणे पायबंद घातला जाणार आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिक पिशव्या तीन महिन्याच्या आत पूर्णपणे नष्ट करायचे आहे. या दृष्टीकोणातून प्रशासकीय पातळीवर काम सुरू झाले असले तरी वर्धा शहरात अनेक सामाजिक संघटना, नगरपालिका यांनी पुढाकार घेवून प्लास्टिकमुक्तीचा संकल्प केला आहे. काही सामाजिक संघटनांनी कापडी पिशव्या तयार करून त्याची विक्रीही व्यावसायिकांना सुरू केली आहे. भाजीपाल्याचे दुकानदार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात. ही बाबत लक्षात घेवून अशा दुकानांमध्ये कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या पिशव्यांवर सामाजिक आशयाचे संदेश लिहिण्यात आले आहे. पाच रुपयापासून या कापडी पिशव्या बाजारात उपलब्ध आहे. हळुहळु कापडी पिशव्यांची आवक बाजारात वाढल्यावर आपोआपच प्लास्टिक पिशवी मागणाऱ्यांना पायबंद बसेल, असे सध्यातरी दिसून येत आहे.
प्लास्टिक बंदीचे हे आहेत फायदे
प्लास्टिक निर्मूलन मोहिमेमुळे पर्यावरणाचे संरक्षण होणार असून बेरोजगार महिलांना शिलाई काम देवून रोजगार उपलब्ध करता येणार आहे. कापडी पिशव्या शिवण्याचे काम त्या करू शकतील. तसेच कापडी पिशव्या भाजीविक्रेते दुकानदार यांनी कमी दरात देवून प्लास्टिक बंदी उपक्रमाला बळकटी देतील. तसेच प्लास्टिकमुळे जनावराच्या आरोग्यावरही परिणाम होत होता. त्यालाही आता पायबंद घातला जाणार आहे. या संदर्भात हेल्पींग हार्ट्स चॅरिटेबल ट्रस्ट वर्धाच्या सोनाली श्रावणे, स्मिता बढिये, योगिता मानकर, निता जानी यांनी प्रसिध्दी पत्रक तयार करून ते प्रत्येक दुकानांवर लावण्याची व्यवस्थाही केली आहे.
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्लास्टिक नष्ट करावे लागणार आहे. त्यानंतरही जे व्यावसायीक व ग्राहक प्लास्टीकचा वापर करीतल, त्यांना तीन महिन्याची शिक्षा नव्या कायद्यानुसार प्रस्तावित आहे. प्लास्टिक बंदीमुळे आता गावागावात महिला बचत गटांनी पुढाकार घेवून कापडी पिशव्या बनविण्यासोबतच पत्रावळी तयार करण्याचे काम सुरू करण्याची गरज आहे. यासाठी महिलांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याकरिता प्रयत्न करू.
- समीर कुणावार, आमदार हिंगणघाट विधानसभा क्षेत्र.
प्लास्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत होता. तसेच प्लास्टिकच्या पत्रावळी सुध्दा आल्याने त्या नष्ट होत नव्हत्या. या साऱ्या बाबी अडचणीच्या होत्या. भाजीपाला दुकानातही प्लास्टिक पिशऱ्याचा वापर सर्रासपणे केला जायचा. बंदीमुळे याला पायबंद बसणार असून शासनाने हा चांगला निर्णय घेतला आहे.
- रोशन कुसळे, भाजी विक्रेता, दादाजी धुनिवाले सब्जी भंडार, वर्धा.