वर्ध्याच्या तरुणाचा पराक्रम; अंटार्क्टिकातील सर्वोच्च शिखरावर रोवला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 02:09 PM2018-01-24T14:09:18+5:302018-01-24T14:57:50+5:30
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेला व जवाहर नवोदय विद्यालय सेलूकाटे येथून शिक्षण पूर्ण केलेला राकेश देवीदास काळे या तरूणाने पर्वतारोहणामध्ये मिशन अंटार्क्टिका पूर्ण केले आहे. त्याच्या या कार्याचा जवाहर नवोदय विद्यालयानेही सन्मान केला.
वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या राकेशचे बारावी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, सेलूकाटे येथे झाले. नवोदयमध्ये शिक्षण घेत असताना त्याची निवड २००५ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय वायुसेनेत झाली. भारतीय वायुसेनेमध्ये नोकरी करीत असताना त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले व नंतर पर्यटनामध्ये एम.बी.ए. केले. सध्या तो भारतीय वायुसेनेमध्ये भूदल परिक्षक या पदावर कार्यरत आहे. राकेशने भारतीय वायुसेनेमार्फत हिमाचल प्रदेश व जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या सहा उंच शिखरांवर यशस्वीरित्या चढाई केली आहे. हे ध्येय पूर्ण करीत असतानाच त्याला मिशन अंटार्क्टिकाची संधी चालू आली. हजारो वायुसैनिकांमधून भारतीय वायुसेनेने मिशनसाठी पाच सैनिकांची निवड केली. त्यामध्ये राकेशचा समावेश होता.
अंटार्क्टिका खंडातील सर्वाच उंच शिखर माऊंट विन्सन पादाक्रांत करण्यासाठी राकेशसह पाच सदस्यांची चमू १२ डिसेंबर २०१७ ला रवाना झाली. भारतीय वायू सेनेचे एअर चिफ मार्शल बी.एस. धनोआ यांनी या मोहिमेसाठी चमूची रवानगी केली. १६ डिसेंबर २०१७ ला चमू चिली या देशात पोहचली. चिलीच्या भारतीय राजदूत अनिता नायर यांनी १९ डिसेंबरला चढाईसाठी हिरवा झेंडा दाखवून चमूला रवाना केले. ७ हजार ७५७ मीटर उंच, उणे ३० ते उणे ५० तापमानात, हाडं गोठवणाऱ्या थंडीत चोवीस तास प्रकाशात ४० ते ५० कि़मी. वेगाने वाहणाऱ्या बर्फाच्या वादळात ४० किलो वजनाचे सामान पाठीवर बांधून दररोज ९ तास अनेक अडथळे पार करीत २६ डिसेंबरला राकेशसह पाच सदस्यीय चमूने अंटार्क्टिकाच्या सर्वात उंच शिखरावर भारताचा तिरंगा व वायुसेनेचा झंडा रोवला. मिशन पूर्ण करून ११ जानेवारीला भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयात ते दाखल झाले. तेथे वायूसेनेच्या अध्यक्षांनी राकेशसह चमूला प्रशस्तीपत्र व पदक देऊन सन्मानित केले. राकेश हा नवीन म्हाडा कॉलनी, वर्धा येथे वास्तव्याला आहे.