एडीस ईजिप्टाय डासांच्या डंखामुळे वर्धेकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 05:00 AM2021-08-30T05:00:00+5:302021-08-30T05:00:16+5:30
सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असून, डेंग्यू या आजाराने जिल्ह्यात थैमानच घातले आहे. डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्यू हा विषाणूपासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डेंग्यू हा विषाणूपासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. सध्या जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय तसेच खासगी हॉस्पिटल डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांमुळे फुल्ल आहेत. डेंग्यू या आजाराने यंदाच्या वर्षी एकाचा बळी घेतला असून आरोग्य यंत्रणेने १९६ डेंग्यू बाधितांची नोंद घेतली आहे.
सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावली असून, डेंग्यू या आजाराने जिल्ह्यात थैमानच घातले आहे. डेंग्यूचा उद्रेक मागील तीन शतकापासून शितोष्ण, समशितोष्ण व उष्ण कटिबंधात आढळून आला आहे. डेंग्यूचा पहिला उद्रेक इसवी सन १६३५ मध्ये फेंच वेस्ट इंडीज येथे आढळून आला. डेंग्यू हा विषाणूपासून होणारा आजार असून त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. मागील दोन दशकांपासून डेंग्यू, ताप, डेंग्यू रक्तस्त्रावीताप व डेंग्यू शॉक सिंड्रोमचे रुग्ण संपूर्ण जगात आढळून आलेले आहेत व त्यात सातत्याने वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित एडीस एजिप्टाय डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार मानवानंतर डास तर नंतर पुन्हा मानव असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे डेंग्यूमुक्त गाव किंवा शहर यासाठी प्रत्येक नागरिकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे.
नारायणपूर येथे घेतला दहा वर्षीय मुलीचा बळी
नारायणपूर : डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने नारायणपूर येथील प्रणाली प्रफुल्ल मुंजेवार (१०) हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रणालीचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रणाली ही नारायणपूर येथील जि.प.च्या शाळेत चवथीचे शिक्षण घेत होती.