वर्धेकरांनो, 'डिजिटल अरेस्ट' पासून वेळीच व्हा सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 05:36 PM2024-09-18T17:36:00+5:302024-09-18T17:37:30+5:30
सायबर चोरट्यांची नवी शक्कल : लाखो रुपयांची होतेय फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : 'आम्ही सीबीआय विभागातून बोलत आहे, तुम्ही देशविघातक कृत्य केले आहे. कुरिअरच्या माध्यमातून ड्रग्ज पाठविले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामधून सुटका करायची असेल तर आम्हाला पाच लाख रुपये अमुक-तमुक खात्यावर पाठवा'. असा कॉल वर्ध्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना आला असून विशेष म्हणजे बोलण्यात गुंतवून संबंधित व्यक्ती ठरलेले पैसे जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल कट करायचा नाही, अशी ताकीद दिली जाते.
एका दृष्टीने समोरच्याचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करून सायबर चोरटे अवघ्या काही मिनिटांत त्याच्याकडून लाखो रुपयांची कमाई करतात. मागील वर्षभरात काही वर्धेकरांनी 'डिजिटल अरेस्ट'चा अनुभव घेतला असून, लाखो रुपये गमावले आहेत. जास्त धोका न घेता, प्रत्यक्षात कोणाला न भेटता, मुख्य म्हणजे एकाच खोलीत बसून दुसऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा उद्योग काही महिन्यांपासून सुरू झाला आहे. नागरिकच जागरूक नसल्याने सायबर चोरट्यांचे फावते आहे. अनेकांना 'समाज काय म्हणेल' आणि 'माझी अब्रू गेली तर मी इतरांना तोंड कसे दाखवू' ही चिंता नेहमी सतावत असते. त्याचाच अचूक फायदा सायबर चोरटे उचलतात. डिजिटल अरेस्ट करण्यासाठी सायबर चोरट्यांची टोळी कार्यरत असते. ही टोळी कार्यरत असते. ही टोळी पीडित व्यक्तीला फोन करून आपण पोलिस, ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग किंवा लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करते. तुम्ही बेकायदेशीर वस्तू, बनावट पासपोर्ट, दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार केल्याचे कोणतेही कारण सांगून 'डिजिटल अरेस्ट' केल्याचे समोरील व्यक्तीला सांगितले जाते. विश्वास बसण्यासाठी सोशल मीडियावरून सीबीआय किंवा तत्सम विभागाचे अटक वॉरंट पाठविले जाते.
चोरटे फेक आयडी देखील पाठवितात. आपल्याला अटक करण्यात आल्याचे समजताच अनेकांच्या पायाखालची वाळूच सरकते आणि ती व्यक्ती जसे सांगते तसे आपण करू लागतो. त्यामुळे कायम जागरुक राहून फसवणुकीची शंका आल्यास तातडीने सायबर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
घाबरू नका, तक्रार दाखल करा
सायबर चोरट्यांचा ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलमार्फत तुम्हाला डिजिटल अरेस्टची भीती घातल्यास घाबरू नका, जो गुन्हा तुम्ही केलेला नाही त्यामध्ये अटक कशी होईल असा साधा प्रश्न मनाला विचारा. समोरून पैशांची मागणी केल्यास कोणत्याही परिस्थितीत पैसे देऊ नका. चोरट्यांनी फेकलेल्या जाळ्यात अडकू नका. थेट सायबर पोलिस ठाण्यात संपर्क करा
आठ महिन्यांत दहावर तक्रारी दाखल
सायबर पोलिस ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर सर्वांत पहिला गुन्हा 'डिजिटल अरेस्ट'चाच दाखल करण्यात आला होता. यामध्ये तक्रारदाराचे लाखो रुपये सायबर चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर मागील आठ महिन्यांत जवळपास १० ते १२ तक्रारी सायबर पोलिसांकडे प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भामटे यांना करतात टार्गेट...
उच्चशिक्षित पिढी नवीन तंत्रज्ञानाबाबत बऱ्यापैकी जागरुक असते. त्यामुळे सायबर चोरटे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी किंवा पन्नाशीच्या पुढील वयाचे व्यापाऱ्यांना टार्गेट करतात. कारण त्यांना अद्ययावत ज्ञान नसल्याने त्यांची फसवणूक करणे सोपे होते.