बंदीनंतरही वर्धेकरांचा सुसाट संचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 05:00 AM2021-04-16T05:00:00+5:302021-04-16T05:00:11+5:30
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. परंतु पहिल्याच दिवशी याला वर्धेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र बघायला मिळाले. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत रस्त्यावर नागरिकांचा मुक्त संचार राहिल्याने ही स्थिती कोरोनाला निमंत्रण देणारी आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यात सर्वाधिक रुग्ण वर्धा तालुक्यात आढळून येत आहे. कोरोनाची ही संसर्ग साखळी तोडण्याकरिता नागरिकांनी घरातच रहावे, याकरिता पंधरा दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. पण, नागरिक अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. शासनाने जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, बँका सुरु ठेवण्यास परवानगी दिल्याने याचाच आधार घेत नागरिक विनाकारण रस्त्याने फिरतांना दिसून आले. पोलिसांनीही शहरातील शिवाजी चौक, आर्वीनाका, पावडे चौक आदी परिसरात नाकेबंदी करुन नागरिकांना सूचना केल्यात. तसेच शिवाजी चौकामध्ये वाहने अडवून काहींकडून दंडही आकारण्यात आला. पण, पोलिसांचीही नाकेबंदी औटघटकेची ठरल्याने नागरिकही सुसाट झालेत. बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी ओसरलेले पहावयास मिळाली पण, बसस्थानकाबाहेर गर्दी दिसून आली. जिल्ह्यात इतरही ठिकाणी संचारबंदीचे तीनतेरा वाजलेलेच दिसून आले.
आदेशानंतरही खासगी शाळा सुरुच
शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहे. इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेकरिता नियमात शिथिलता देण्यात आली आहे. असे असतानाही गुरुवारी बऱ्याच खासगी तसेच अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती दिसून आली आहे. शाळा व्यवस्थापनही शिक्षकांना शाळेत येण्याची सक्ती करीत असल्याने यावर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कुंभमेळ्यातून येणाऱ्यांनी आधी तपासणी करावी
जिल्ह्यातील काही भाविक कुंभमेळ्याकरिता गेले आहेत. ते परतीच्या मार्गावर असून जिल्ह्यात दाखल होणार आहेत. सर्व भक्तांनी जिल्ह्यात आल्यानंतर स्वत: कोविड सेंटरमध्ये जावून तपासणी करुन घ्यावी. तसेच गृहविलगीकरणात राहून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच कुंभमेळ्याकरिता गेलेल्यांची माहिती मिळाल्यास पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व एसपी प्रशांत होळकर यांनी केले.
आता दंड नकोत, दंडुकाच हवाय !
प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याकरिता उपाययोजना करुन ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केले जात आहे. पंधरा दिवस संचारबंदी कायम ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनाकडूनही कंबर कसण्यात आली आहे. याकरिता ९० पोलीस अधिकारी, ७०० पोलीस कर्मचारी तर ५०० गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाने नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. पण, नागरिक जुमानत नसल्याचे दिसून येत असल्यामुळे आता दंड नकोत, दंडाच हवाय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर होत असलेली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेण्यापूर्वीच ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ओळखून या महामारीच्या काळातसर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.