बुधाचे सूर्यबिंबावरून अधिक्रमण पाहण्याची वर्धेकरांना संधी
By admin | Published: May 9, 2016 02:04 AM2016-05-09T02:04:22+5:302016-05-09T02:04:22+5:30
आपल्या ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सोमवारी सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जाणार आहे. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसून येईल.
आजच योग : बहार नेचर फाऊंडेशन, अंनिस, आकाश निरीक्षण मंडळ व शिववैभवचे आयोजन
वर्धा : आपल्या ग्रहमालेतील सर्वात लहान ग्रह बुध हा सोमवारी सूर्य व पृथ्वी यांच्यामधून जाणार आहे. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकताना दिसून येईल. यालाच शास्त्रीय भाषेत अधिक्रमण असे म्हणतात. या घटनेसबंधात विद्यार्थी व जनतेला वैज्ञानिक माहिती मिळावी व खगोल संदर्भातील अंधश्रद्धांचे निराकरण व्हावे म्हणून बहार नेचर फाउंडेशन, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आकाश निरीक्षण मंडळ व शिववैभव शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिववैभव येथे एका प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
बुध हा सूर्यमालेतील आकाराने सर्वात लहान ग्रह असून सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह आहे. तो ८८ दिवसांत सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. सूर्याभोवती फिरत असताना काही वेळेला तो पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो. त्यामुळे एक छोटासा काळा ठिपका सूर्यबिंबावरून मार्गक्रमण करताना दिसून येतो. बुधाचे हे अधिक्रमण क्वचितच पाहायला मिळणारी घटना असून सोमवारी हे अधिक्रमण पृथ्वीवासीयांना पाहता येणार आहे. वर्धेतील नागरिकांना दुपारी ४ वाजून ३२ मिनिटांपासून सूर्य मावळेपर्यंत हे अधिक्रमण दिसणार आहे. ही घटना विद्यार्थी व नागरिकांना पाहता यावी व या घटनेमागील वैज्ञानिक दृष्टीकोन समजावून घेता यावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ४ वाजता स्थानिक शिववैभव सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात बुधाचे अधिक्रमण म्हणजे काय ? यावर बहार नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर वानखडे, आकाश निरीक्षण कसे करावे ? यावर अंबेजागाई येथील खगोल अभ्यासक हेमंत धानोकर व खगोलशास्त्रासंबंधातील अंधश्रद्धा यावर आकाश निरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पंकज वंजारे मार्गदर्शन करतील. याशिवाय उपस्थितांना पडद्यावर बुधाच्या अधिक्रमणाचे दर्शनही घडेल.(प्रतिनिधी)