चण्याच्या खरेदीला गोदामाची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 11:39 PM2018-03-15T23:39:45+5:302018-03-15T23:39:45+5:30
शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे.
ऑनलाईन लोकमत
वर्धा : शासनाने चण्याची खरेदी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाही सुरू आहे. सध्या जिल्ह्याची शेतमाल खरेदी यंत्रणा तूर खरेदीत व्यस्त आहे. या तूर खरेदीतच जिल्ह्यातील गोदाम फुल्ल झाल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा, असा प्रश्न पणन महासंघाला पडला आहे. यामुळे जिल्ह्यात दिलेल्या मुदतीत चण्याची खरेदी सुरू होईल अथवा नाही या बाबत संशय निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात रबी हंगामात चण्याचे पीक घेणारे शेतकरी अनेक आहेत. या शेतकऱ्यांकडून आता त्यांचे चण्याचे पीक काढण्याचे काम सुरू झाले आहे. आर्थिक अडचणीमुळे काढलेला चणा घरी ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांकडून तो बाजारात विक्रीकरिता आणल्या जात आहे. शेतकºयाचा शेतमाल बाजारात येताच भाव पडण्याचा प्रकार याही हंगामात होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकºयांना किमान हमीभाव मिळावा याकरिता शासकीय खरेदीकडे त्यांच्या नजरा आहेत. शासनाने खरेदीच्या सूचना दिल्या. यानुसार खरेदी सुरू करणे अनिवार्य आहे. मात्र गोदामात जागा नसल्याने खरेदी केलेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांना पडला आहे. नाफेडच्या मार्फत खरेदी होणारी तूर आणि इतर शेतमाल ठेवण्याकरिता जिल्ह्यात दोन गोदाम आहेत. यातील एक एमआयडीसी तर दुसरे बोरगाव (मेघे) परिसरात आहे. या दोन्ही गोदामात सध्या तूर आहे. आतापर्यंत खरेदी झालेल्या तुरीमुळे गोदाम फुल्ल आहे. यामुळे बरीच तूर बाजार समितीत पडून आहे. यात आता चणा खरेदी सुरू करण्याच्या सूचना आहेत. यानुसार कार्यवाही केल्यास खरेदी झालेला चणा कुठे ठेवावा असा प्रश्न खरेदी यंत्रणेला पडला आहे.
बाजारातून शेतमाल नेण्याकरिता वाहतुकीचीही अडचण
खरेदी झालेला धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता वाहतुकीची व्यवस्था असणे अनिवार्य आहे. तशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर या वाहतुकदारांची देयके अदा करण्यात आली नसल्याने त्यांच्याकडून धान्यसाठा गोदामात पोहोचविण्याकरिता टाळाटाळ होत असल्याची माहिती आहे. यामुळे खरेदी झालेला शेतमाल बाजार समितीतच पडून आहे.
या वाहतुकदारांकडून देण्यात आलेले दर शासनाच्या दरापेक्षा अधिक असल्याने ही अडचण निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. धान्य वाहतुकीकरिता दोन किमी अंतराकरिता ६९ रुपये किमी दर ठरविले आहे. या उलट खासगी वाहतुकदारांकडून १२० रुपये किमीचे दर लावले जात आहे. याचा परिणाम येथे पडत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे ही अडचण आणखीच तीव्र होत असल्याचे बोलले जात आहे.
हिंगणघाट, समुद्रपूर आणि वर्धा तालुक्यात वाहतुकीची अडचण अधिक असल्याची माहिती आहे. तर कारंजा (घाडगे) येथे अंतराची समस्या या कामात आडकाठी ठरत आहे.
शेतमाल गोदामात गेल्याशिवाय चुकारे नाही
शेतकºयांचा शेतमाल खरेदी झाल्यानंतर त्याची जोपर्यंत शासनाच्या वेअर हाऊसच्या खात्यावर नोंद होत नाही तोपर्यंत शेतकºयाचे चुकारे मिळत नाही. सध्या गोदामात जागा नसल्याने शेतकºयांची अडचण वाढत असून चुकाºयांकरिता प्रतीक्षा करावी लागत आहे.