आरोपी एकटाच की सोबत होता सहकारी?; सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 03:20 AM2020-02-06T03:20:54+5:302020-02-06T03:21:41+5:30
आतापर्यंतच्या जबाबात एकाचाच उल्लेख
वर्धा : हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र घटनेच्यावेळी आरोपी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची माहिती घेण्यासाठी परिसरातील आणि विविध पेट्रोलपंपांवरील सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे.
या प्रकरणाचा तपास पुलगाव येथील महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे आहे. आतापर्यंत पोलिसांनी ११ व्यक्तींचे जबाब नोंदविले आहेत. परंतु, या सर्व जबाबांमध्ये आरोपी एकटाच होता असा उल्लेख आल्याने नागरिकांमध्ये होत असलेल्या सहआरोपीबाबतच्या चर्चेची पडताळणी करण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रिकरण तपासले जात आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून पेट्रोल काढून ते पीडितेच्या अंगावर फेकले ती बाटली, टेंभा, आरोपीचे कपडे आदी साहित्य जप्त केले आहे.
आरोपीचे बदलविले जातेय लोकेशन
हिंगणघाट येथील घटनेनंतर जनतेच्या संतप्त भावना आणि या प्रकरणातील आरोपीची सुरक्षा लक्षात घेऊन पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीला वेळोवेळी इतर पोलीस ठाण्याच्या कोठडीत हलविले जात आहे. सुरुवातीला हिंगणघाट येथे ठेवण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर आरोपीला वर्धा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र लगेच बुधवारी आरोपीला समुद्रपूर पोलिस ठाण्याकडे रवाना करण्यात आले.
फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करणार - यशोमती ठाकूर
महिला अत्याचाराच्या ही आणि यांसारख्या घटना धक्कादायक आणि वेदनादायक असून, ‘त्या’ माथेफिरूंना फाशीचीच शिक्षा दिली जावी, असे मत राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. महाआघाडी सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीतसुद्धा याबाबत सविस्तर चर्चा झाली. फास्ट ट्रॅक कोर्टात खटल्या तातडीने निकाल घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
पीडितेची स्थिती अद्याप नाजूक
नागपूर : वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या तरुणीची स्थिती अद्यापही चिंताजनक आहे. नागपूरच्या आॅरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांची टीम सतत तिच्या स्थितीवर नजर ठेवून असून उपचार सुरू आहेत.
पीडित युवतीची श्वसनलिका आणि फुप्फुसे, चेहरा, गळा, डोके, डावा हात आणि छातीवर चांगलेच भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
आरोपीला फाशी द्या
राजुरा तालुका महिला काँग्रेस कमिटी, जिल्हा भाजप कमिटी यांनी घटनेचा निषेध करून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
संगिता बोबडे यांनीही महिला सहकाऱ्यांसह घुग्घुस पोलीस ठाण्यात येऊन निवेदन दिले.