पांढरकवडा पारधी बेड्यावर राबविली ‘वॉश आॅऊट’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:10 AM2017-10-09T00:10:56+5:302017-10-09T00:11:09+5:30
दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणा दरम्यान सावंगी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा .....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या सणा दरम्यान सावंगी ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून ‘वॉश आऊट मोहीम’ राबविली. यावेळी पाच दारूविके्रत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलिसांनी दारूसाठ्यासह १.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सावंगी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पांढरकवडा पारधी बेड्यावर अचानक छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. यावेळी पोलिसांनी दारूविक्रेत्यांनी परिसरातील झुडूपांमध्ये व जमिनीत लपवून ठेवलेला कच्चा मोह रसायन सडवा शोधून तो नष्ट केला. तसेच पोलिसांनी सदर कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारूही जप्त केली. ती तेथेच नष्ट करण्यात आली. या कारवाईदरम्यान सावंगी पोलिसांनी पाच दारूविके्रत्यांना ताब्यात घेवून त्यांच्या कडून गावठी दारूसह गावठी दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य, असा एकूण १ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या प्रत्यक्ष हजेरीत सावंगी ठाण्यातील पीएसआय पारडकर, उराडे, लोंढेकर, बिसणे, चाटे, हनवते, आरेकर, रवी डहाके आदींनी केली. परिसरात कुठेही दारूविक्रीचा व्यवसाय सुरू असल्यास त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ठाणेदार शेगावकर यांनी केले आहे.