पांढरकवडा पारधी बेड्यावर ‘वॉश आऊट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 10:38 PM2018-04-14T22:38:23+5:302018-04-14T22:38:23+5:30
सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सावंगी पोलिसांनी नजीकच्या पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी चार दारूविक्रेत्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण २.३० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पांढरकवडा पारधी बेड्यावर छुप्या पद्धतीने गावठी दारू गाळून त्याची परिसरातील गावांमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी पांढरकवडा पारधी बेड्यावर छापा टाकला. याप्रसंगी पोलिसांनी भिमा मानकर, रमेश चिमने दोन्ही रा. येळाकेळी व विकास भोसले, सुमित्रा भोसले दोन्ही रा. पांढरकवडा पारधी बेडा यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गावठी दारू जप्त केली.
सदर मोहिमेदरम्यान पोलिसांनी पारधी बेडा परिसरात दारूविक्रेत्यांनी जमिनीत लपवून ठेवलेल्या मोह रसायन सडव्याचा शोध घेवून तो नष्ट केला. सदर प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात भिमा मानकर, रमेश चिमने, विकास भोसले, सुमित्रा भोसले या चारही दारू विक्रेत्यांविरुद्ध दारूबंदीच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या मार्गदर्शनात सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, रामदास बिसने, प्रदीप राऊत, विकास अवचट यांच्यासह सावंगी ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.