Corona Virus in Wardha; वाशिमच्या कोविड रुग्णाचे वर्ध्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 02:53 PM2020-05-29T14:53:03+5:302020-05-29T14:53:24+5:30
वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री या इसमाची प्राणज्योत मालवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मध्यरात्री या इसमाची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसस्कार करण्यात आले.
८ मे रोजी हा रुग्ण सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा स्वॅब तपासणीला पाठविण्यात आला. १० मे रोजी सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानंतर त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मागील आठ दिवसांपासून या रुग्णाची प्रकृती दिवसेंदिवस खालवत असल्याने त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. पण मध्यरात्री २ वाजता त्याचा मृत्यू झाला.
धामणगावच्या चार रुग्णांना आज मिळणार सुट्टी
मेंदुज्वराची लागण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील तरुणीला सावंगीच्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती तिला कोरोनाची लागण झाल्याचेही पुढे आले. सदर तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर तिच्या निकट संपकार्तील व्यक्तींचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले. त्यानंतर या तरुणीची आई व दोन बहिणीही कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. एकाच परिवारातील चारही कोरोना बाधित रुग्ण आता पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयातून आज सुट्टी देण्यात येणार आहे.