हिंगणी परिसरात वॉशआऊट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:29 AM2019-01-16T00:29:30+5:302019-01-16T00:29:59+5:30
सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात गावठी दारू नष्ट करून दारूगाळण्याचे साहित्य असा एकूण ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
दारूविक्रीच्या व्यवसायामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या भागात निर्माण झाला होता. शिवाय दारूबंदी असताना अति मद्यप्राशनाने याच भागातील जामणी पारधी बेडा शिवारात एकाचा मृत्यू झाला. दारू विक्रीच्या व्यवसायाचा महिलांना होणारा त्रास व कायदा तसेच सुव्यवस्थेबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतर्फे सेलू, हिंगणी भागांमध्ये ठिकठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात कच्चा मोह रसायन सडवा व गावठी मोहा दारूचा शोध घेवून तो मुद्देमाल नष्ट करण्यात आला. शिवाय मोठ्या प्रमाणात दारू गाळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या ४ पथकांनी सेलू व हिंगणी परिसरात छापे घालून आरोपी राजन बोदलखंडे (३५) तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण १ लाख ७ हजार २८५ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींविरुद्ध मुंबई दारूबंदी काद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय इतर ठिकाणी छापा टाकून दारूगाळण्याचे साहित्य व गावठी दारू असा एकूण ४.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार पंकज पवार, महेंद इंगळे, अशोक साबळे, उदरसिंग बारवाल, किटे, जांभूळकर आदींनी केली.
नाकेबंदी करून कारसह देशीदारू पकडली
देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नाकेबंदी करून पोलिसांनी केलेल्या कारवाईत कारसह देशी दारू असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यवतमाळ जिल्ह्यातून खरेदी केलेली देशी दारू कारच्या सहाय्याने देवळी मार्गे वर्धा जिल्ह्यात आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी रत्नापूर शिवारात नाकेबंदी करून ए.एच.०१ ए.ई. ५७२६ क्रमांकाची कार अडविली. पोलिसांनी कारचालक सिद्धार्थ जेटीथोर आणि हर्षल राजू खोपाल रा. देवळी याला ताब्यात घेवून कारची बारकाईने पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारू आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे.
या कारवाईत पोलिसांनी देशी दारूच्या एकूण २० पेट्या व दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण २ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ), (ई), ७७ (अ), ८३ सह. कलम १३०/१७७ मो.वा.का. अन्वये गुन्ह्याची नोंद घेतली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे याच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निदेर्शानुसार पोलीस हवालदार निरंजन वरभे, ना.पो.शि. कुलदीप टांकसाळे, पो.शि. राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विकास अवचट आदींनी केली. पुढील तपास सुरू आहे.
जिल्ह्यात कुठेही दारूची विक्री होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.