वर्धा नदीपात्राला सर्वत्र घाणीचा विळखा
By admin | Published: October 27, 2015 03:25 AM2015-10-27T03:25:07+5:302015-10-27T03:25:07+5:30
जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा
वर्धा : जिल्ह्याची ओळख असलेली वर्धा(पूर्वीचे नाव वरदा) नदी ही जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहे. नदीला मोठी सांस्कतिक परंपरा लाभली आहे. परंतु या नदीपात्राची स्वच्छता होत नसल्याने पात्राला अवकळा आल्याचे चित्र सध्या पुलगाव परिसरात पहावयास मिळत आहे.
परिसरात वर्धा नदीचे मोठे पात्र लाभले आहे. हजारो हेक्टर शेतजमीन यामुळे सिंचित झाली आहे. परंतु संबंधित विभागाच्या उदासीन धोरणामुळे पुलगाव परिसरात वर्धा नदीपात्राला अवकळा आली आहे. परिसरात सर्वत्र हराळी शेवाळ आणि तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या शेवाळामुळे नैसर्गिक प्रवाह काही प्रमाणात अवरुद्ध होत आहे. तसेच शेवाळामुळे गाळ साचून त्यात विषाणूंची निर्मिती होऊन पाण्याला दुर्गंधी सुटली आहे.
या नदीकाठावर अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यामुळे धार्मिक आणि सांस्कतिकदृष्ट्याही या नदीला आणि पुलगाव परिसराला मोठे महत्त्व आहे. अधिक महिन्यात हा परिसर भक्तांनी गजबजलेला असतो. असे असतानाही शासकीय यंत्रणेद्वारे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याकडे कुठलीही ठोस पावले उचलली जात नाही. पुलगाव शहराला याच पात्रातून पाणीपुरवठा होतो. परंतु पात्र प्रवाही नसल्याने पाण्याद्वारे शेवाळही ओढले जाऊत ते पाईपमध्ये साचते.
पुलगाव शहरातील गणेशोत्सव आणि दूर्गोत्सव हे दोन्ही सण उत्साहात भव्य प्रमाणात साजरे केले जातात. त्यामुळे हजारोंच्या संख्येने मूर्ती नदीपात्रात विसर्जित होतात. त्यामुळेही पात्र दूषित होते. आजघडीला शेवाळ आणि हराळी तण वाढल्याने नदीपात्र उथळ झाले आहे. मोठ्या प्रमाणात गाळ येथे साचला आहे. परिणामी पाण्याची साठवणक्षमता ही कमी होत चालली आहे. पाणी दुर्गंधीयुक्त झाल्याने त्वचेचे आजार वाढत आहे. नदीवर दोन मोठी धरणे बांधण्यात आल्याने पूर्वीप्रमाणे नदी प्रवाही राहात नाही. याचाही परिणाम होऊन अनेक ठिकाणी नदी केवळ डबक्यासारखी झाली आहे. या सर्व बाबी ध्यानात घेत वर्धा नदी स्वच्छता मोहीम हाती घावी अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
याच नदीमुळे वर्धा आणि अमरावती हे जिल्हे विभागले गेले आहे. नदीवर असलेल्या पुलावरून अमरावतीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. दिवसभर या पुलावरून वाहनांची वर्दळ सुरू असते. असे असतानाही या इंग्रजकालीन पुलावर कठडे नाही. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. मोठ्या प्रमाणात बसेस आणि अवजड वाहनेही या पुुलावरून धावतात. एखादे वाहन अनियंत्रित झाल्यास प्रवाश्यांना जीव गमवावा लागू शकतो.
४काहीच दिवसांपूर्वी या पुलाची दुरुस्ती करण्यात आली. परंतु दुरुस्तीदरम्यान येथे कठडे लावण्याचा प्रशासनाला विसर पडला. अपघाताची शक्यता लक्षात घेता येथे कठडे लावण्याची गरज प्रवासी व्यक्त करतात.
नदीपात्रात वाहनेही धुतली जातात
येथील अनेक वाहनधारक आपली अवजड वाहने सरळ नदीपात्रात धुण्यासाठी आणतात. त्यामुळे नदीपात्र दूषित होते. तसेच पात्रातून नियमबाह्य रेतीचा उपसा हा केला जातोच. त्यामुळेही नदीची मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे. गणेश व दूर्गा मूर्ती येथे विसर्जित करण्यात येतात. परंतु विसर्जन प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्रातून गाळाचा उपसा केला जात नाही. यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता निदर्शनास येते. प्राचीन परंपरेने समृद्ध असलेल्या या नदीला आणि पुलगाव येथील नदीपात्राला या काही वर्षात अवकळा पसरली आहे. पाणी दूषित होऊन नागरिकांना त्वचेचे आजार बळावण्याची शक्यता आहे. परिसरातील सामाजिक संघटनाही पात्राच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नसल्याने सामान्य नागरिक संताप व्यक्त करतात.