मोझरी परिसरातील मार्गांने बिकट वहिवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 09:27 PM2019-03-20T21:27:50+5:302019-03-20T21:28:25+5:30
मागील काही वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा तेथे रस्ता तयार करण्यात आला. परंतु त्यानंतर या डांबरी रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा खड्डेमय प्रवास सुरु झाला. तो अद्यापही थांबला नसल्याने मोझरी परिसरातील नागरिकांची वहिवाट बिकट झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोझरी (शे) : मागील काही वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत गावा तेथे रस्ता तयार करण्यात आला. परंतु त्यानंतर या डांबरी रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नागरिकांचा खड्डेमय प्रवास सुरु झाला. तो अद्यापही थांबला नसल्याने मोझरी परिसरातील नागरिकांची वहिवाट बिकट झाली आहे.
मोझरी (शेकापूर) ते कानगाव या मार्गाने नेहमी वर्दळ असते. परंतु या मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोझरी, खानगाव, आंबोडा हा मार्ग पूर्णत: खड्डेमय स्थितीत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. मोझरी (शे.), पोटी मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडलेले आहे. तसेच नाल्यावरील पुलांची स्थितीही खराब आहे. मोझरी ते कापसी हा ७ किलो मीटर अंतराचा मार्ग स्वातंत्र्यापासून अजुनही दुर्लक्षित आहे. या मार्गावर आतापर्यंत साधे खडीकरणही झाले नाही. याला शासनाची उदासीनता म्हणावे की लोकप्रतिनिधीचे अपयश, असा मतप्रवाह नागरिकांमध्ये दिसून येतो. विकासाच्या कामामध्ये या भागावर नेहमीच दुजाभाव केल्या जात असल्याची ओरड होत आहे. अनेक विकास कामे ही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. या मार्गाची मागील अनेक वर्षापासून उखडलेल्या रस्त्यांवरुनच नागरिकांचा प्रवास सुरु असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांचेही नुकसान होत असून वाहनचालकांसह प्रवाशांनाही पाठीचा व मानक्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील मार्गाची दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वारंवार केली प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे केली. मात्र अद्यापही या मागणींची दखल घेतली नसल्याने मार्गाचे भाग्य उजळले नाही. परिणामी मार्गावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सध्या खड्डेमय रस्त्यांच्या सोबतीला रस्त्याच्या कडेला वाढलेली झुडपेही त्रासदायक ठरत आहे. या झुडपांमुळे अतिक्रमण वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देत झुडूपांचे अतिक्रमण हटवावे आणि रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी मोझरीसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.