श्रमदानासाठी येणाऱ्यांचे स्वागत करते सांडपाणी
By admin | Published: May 15, 2017 12:37 AM2017-05-15T00:37:28+5:302017-05-15T00:37:28+5:30
गावात सध्या वाटर कप स्पर्धेची धामधूम आहे. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ सकाळ-सायंकाळ श्रमदान करीत आहे.
डासांचा वाढता प्रादुर्भाव : स्मार्ट गाव म्हणून मिरविणाऱ्या गावातच दुर्गंधीचे साम्राज्य
लोकमत न्यूज नेटवर्क
विरूळ (आकाजी) : गावात सध्या वाटर कप स्पर्धेची धामधूम आहे. गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ सकाळ-सायंकाळ श्रमदान करीत आहे. सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी गावात येऊन श्रमदान करीत आहे. ग्रा.पं. प्रशासन एक महिन्यापासून या कामी आहे. मागील आठवड्यात गावाला दहा लाखांचा पुरस्कारही जाहीर झाला. स्मार्ट ग्राम स्पर्धेत आर्वी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान गावाने पटकाविला. ही आनंदाची बाब असली तरी समस्या ‘जैसे थे’ आहेत.
गावातील नाल्या पूर्णत: बुजल्या आहे. भवानी वॉर्डातील प्राथमिक शाळेजवळची नाली बजून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे या वॉर्डात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गावातील अनेक नाल्यांची हीच स्थिती आहे. एकीकडे स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे; पण येथील ग्रा.प. या मिशनला ग्रहण लावत असल्याचे गावात आल्यावर दिसून येते. काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने गावातील नाल्या उपसणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. भवानी वॉर्डातील नाल्यांचे तर एकदमच खस्ताहाल झाले आहे. मागील ३० वर्षांपासून या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे ही नाली पूर्णत: खचली असून बुजली आहे. या नालीचे बांधकाम करून ती ऊंच करण्याची गरज व्यक्त होत आहे. ज्यांची घरे या नाल्यांच्या काठावर आहे, त्यांना साप, विंचु, किटकांचा त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील काही नागरिकांनी शेणखतांचे ढिगारे ऐन रस्त्यावर आणून टाकले आहे. गावात मुख्य चौकात दोन हायस्कूल, कॉलेज आहे. या शाळांसमोरच काही नागरिक शौचास बसत असल्याचे दिसते. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. गावाच्या मुख्य चौकातच उघड्यावर बकऱ्या, कोंबड्यांची कत्तल होत असल्याने घाण होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांकडे ग्रा.प.ने लक्ष देण्याची गरज आहे. वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानामुळे गावास नावलौकिक प्राप्त होत आहे. यामुळे शासनाचे अधिकारी, पदाधिकारी गावास भेटी देतात; पण त्यांना गाव स्वच्छ दिसावे, याची दक्षता घेणे गरजेचे झाले आहे.