गौण खनिजांच्या वाहतुकीवर ‘वॉच’; जिल्ह्यात ‘फ्लाइंग स्कॉड’ कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 09:34 PM2022-11-17T21:34:42+5:302022-11-17T21:36:41+5:30
प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यासाठी महसूल विभागाने आता आठही तालुक्यात दोन ते तीन भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. यामुळे गौण खनिज ठेकेदार आणि वाहतूकदारांकडून मारल्या जाणाऱ्या भूलथापांना चाप बसणार आहे.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अवैध गौण खनिज वाहतुकीद्वारे स्वत:चे उखळ पांढरे करणाऱ्या ठेकेदारांच्या मुसक्या आता महसूल विभागाने आवळल्या आहेत. महसूल विभाग ॲक्शन मोडवर आला असून, उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर वॉच ठेवणारी गौण खनिज उत्खनन नियंत्रणासाठी जिल्ह्यातील आठही तालुक्यात ‘फ्लाइंग स्कॉड’(भरारी पथक) कार्यान्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदारांना दिले आहेत.
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. प्रशासनाकडून कारवायांचा बडगा उगारला जात असला तरी असे गैरप्रकार सुरूच आहेत. अनेकदा महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर माफियांकडून हल्लेही झाले आहेत. एकीकडे सरकारचा महसूल बुडत असताना अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीचे ‘उद्योग’ मात्र सुरूच आहेत. ते थोपविण्यासाठी महसूल विभागाने आता आठही तालुक्यात दोन ते तीन भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. यामुळे गौण खनिज ठेकेदार आणि वाहतूकदारांकडून मारल्या जाणाऱ्या भूलथापांना चाप बसणार आहे.
आठही तालुक्यातील विविध मार्गांवर उभारण्यात आले ‘चेकपोस्ट’
- गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी आठही तालुक्यात भरारी पथके नेमून विविध मार्गांवर ‘चेकपोस्ट’ स्थापन करण्यात आले आहेत. या चेकपोस्टवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत स्थायी पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकात १ तलाठी, १ कोतवाल, १ पोलिस शिपाई यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पथकातील सदस्य विनापरवानगी गैरहजर राहिल्यास व कर्मचारी दोषी आढळल्यास कार्यवाही करण्यात येणार आहे.
- जिल्ह्यातील वर्धा तालुक्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा चौक, सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे ते भोसा रस्त्यावर, देवळी तालुक्यात भारत टेक्सटाइल मिलजवळ, रेल्वे फाटक पुलगाव, आर्वी तालुक्यात वर्धा ते तळेगाव रस्त्यावरील वळण रस्त्यावर असलेल्या वसंतराव नाईक चौक/पिंपळगोटा. आष्टी तालुक्यात जामगाव फाटा, कारंजा तालुक्यात नारा ते कारंजा रस्त्यावर, हिंगणघाट तालुक्यात नंदोरी चौक जामकडे जाणारा रस्ता व हिंगणघाट शहरात जाणाऱ्या रस्त्यावर आणि समुद्रपूर तालुक्यात मांडगाव रस्त्यावर ‘चेकपोस्ट’ उभारण्यात आले आहे.
भरारी पथक राहणार २६/७ दक्ष
- गोण खनिजांचे अवैध उत्खनन, साठवणूक व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच अवैध वाळूसाठ्याबाबतची कार्यवाही अधिक तीव्र होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार, तालुकास्तरावर २४/७ भरारी पथक कार्यान्वित केले आहे. अवैध उत्खनन व वाहतुकीदरम्यान दोषी आढळून आल्यास संबंधित वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
सात दिवसांनंतर पथकात होणार बदल...
- प्रत्येक तालुक्यात जवळपास २ ते ३ भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहे. भरारी पथकातील अधिकारी, कर्मचारी सात दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी कार्यान्वित राहणार नसून त्यांच्यात सात दिवसानंतर बदल करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून आठही तालुक्यात चेकपोस्ट आणि भरारी पथके कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. यामुळे वाळूमाफिया तसेच गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक करणाऱ्या चोरट्यांवर आळा बसण्यास मदत होईल. पारदर्शी प्रक्रिया राबविण्यासाठी कारवाईचे छायाचित्रीकरण व फोटोग्राफी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
अतुल दौड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, वर्धा
वाळू माफियांचा नवा फंडा; कारवाईक-डे लागले लक्ष...
एकीकडे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यासाठी महसूल विभाग आणि पोलीस विभागातील यंत्रणा अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. दररोज पोलीस विभागाकडून कारवाई देखील केली जात आहे.
मात्र, दुसरीकडे महसूल विभागातीलच काही ‘बड्या’ अधिकाऱ्यांच्या मुकसंमतीने रात्रीच्या सुमारास काही ठिकाणी अजूनही वाळूचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. चोरटे वाळूचा उपसा करुन डील परमिट असलेल्या ठिय्यावर नेऊन टाकत असल्याचे चित्र आहे.
सध्या काही ठिकाणी सुरु असलेला हा प्रकार तहसीलदारांच्या आर्शीवादाने होत असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर त्या तहसीलदाराला याबाबतची पूर्ण कल्पना देऊनही कारवाई केली जात नसल्याने जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकड लक्ष लागले आहे.
नायब तहसीलदार राहणार पथक प्रमुख
- प्रत्येक तालुक्यात २ ते ३ भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून पथकप्रमुखाची जबाबदारी नायब तहसीलदारांच्या खांद्यावर आहे. पथकात १ मंडळ अधिकारी, दोन तलाठी, २ पोलिस शिपाई, १ कोतवाल यांचा समावेश राहणार आहे.