वर्धा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून काढला रखवालदाराचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:45 PM2019-02-06T13:45:45+5:302019-02-06T13:48:30+5:30
वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून ठार केले. हे प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून घडले असे पोलीस तपासात समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून ठार केले. हे प्रकरण जादूटोण्याच्या संशयावरून घडले असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर खात्रीदायक माहितीच्या आधारे चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून केवळ पाच हजारांची सुपारी घेवून श्रावणची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.
इंझाळा येथील शेतकरी मंगेश भानखेडे यांच्या शेतातील गोटफॉर्मवर बुधवारी रात्रीला काही जण आले. त्यांनी पळ काढण्यापूर्वी रखवालदार श्रावण पंधराम याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. शेतातून पळ काढताना आरोपींपैकी एक जण शेतातील विहिरीत पडला. त्याला शेतमालक मंगेश भानखेडे यांनी रखवालदार समजून विहिरीबाहेर काढले होते. परंतु, मोठ्या शिताफीने त्यानेही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पुलगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते. परंतु, त्यांना यश आले नसल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले. दरम्यान खात्रीदायक माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश शंकर पाखरे (४०) रा. इंझाळा, ईश्वर अशोक पिंजरकर (३६), अंकुश उर्फ मोन्या विलास शेंडे (२४) दोन्ही रा. नाचणगाव आणि नाचणगाव येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. सुरूवातीला उडवा-उडवीचे उत्तर देणारे हे संशयीत पोलिसी हिसका मिळताच बोलके झाले. शिवाय त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदर तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्था.गु. शा.चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निदेर्शाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पंकज पवार, आशीष मोरखडे, पो.ह.वा. निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, दिनेश बोथकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली.
अनिकेतच्या मृत्यूस श्रावण जबाबदार ठेवला ठपका
इंझाळा येथील रमेश पाखरे याचा मुलगा अनिकेत (१८) याचा मार्च २०१८ मध्ये मृत्यू झाला. अनिकेतवर श्रावणनेच जादूटोणा केला त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शिवाय सध्या माझ्या दुसऱ्या मुलाचीही प्रकृती ठिक नाही. त्याच्यावरही श्रावणने जादूटोणा केला. अनिकेतचा जादूटोणा करून श्रावणने बळी घेतला त्यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचा कट रचला अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याने पोलिसांना दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.
हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांड्यांची खरेदी
या प्रकरणातील आरोपी ईश्वर पिंजरकर हा मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याचा साळभाऊ आहे. शिवाय मुख्य आरोपीने आपल्या साळभावाच्या मध्यस्थीने इतर तीन आरोपींना श्रावणच्या हत्येसाठी पाच हजार रुपए देण्याचे आमिष दिले. संपूर्ण नियोजन झाल्यानंतर आरोपींनी मृतकाला मारण्याकरिता नाचणगाव येथील एका हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांडा खरेदी केला. त्यानंतर श्रावणचा काटा काढण्याच्या उद्देशाने आलेल्या अल्पवयीन मुलासह इतर आरोपींना मुख्य आरोपी रमेश पाखरे यांने त्याच्या घरी आश्रय दिला होता.