‘वॉटर एटीएम’ठरले मद्यपींना फायद्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:47 PM2018-05-06T21:47:19+5:302018-05-06T21:47:19+5:30
सर्वसामान्यांना अत्यल्प मोबदल्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविधा इमारतीच्या आवारात ‘वॉटर एटीएम’ सुरू करण्यात आले. या एटीएमची सर्वसामान्यांना विशेष माहिती नसली तरी या भागात रात्रीला रंगणाऱ्या दारू पार्टीत सहभागी होणाऱ्यांना त्याची पूरेपूर माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सर्वसामान्यांना अत्यल्प मोबदल्यात पाण्याची सोय व्हावी म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविधा इमारतीच्या आवारात ‘वॉटर एटीएम’ सुरू करण्यात आले. या एटीएमची सर्वसामान्यांना विशेष माहिती नसली तरी या भागात रात्रीला रंगणाऱ्या दारू पार्टीत सहभागी होणाऱ्यांना त्याची पूरेपूर माहिती आहे. सर्वसामान्यांना जरी या एटीएमचा लाभ होत नसला तरी या मद्यपींना होत असल्याचे दिसते. या आवारात भरणाऱ्या रात्रीच्या पार्टीतील अनेकांकडून येथील थंड पाण्याचा चांगलाच लाभ घेण्याचा प्रकार येथे घडत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी यावर प्रतिबंध लावत त्याचा सर्वसामान्यांना लाभ व्हावा या दिशेने उपाययोजना आखण्याची मागणी आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या वॉटर एटीमचे लोकार्पण झाले. यात ठराविक रक्कम टाकताच थंड पाणी मिळण्याची सुविधा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह येथील प्रशासकीय इमारतीत येत असलेल्या सर्वसामान्यांना पाण्याकरिता अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून या भागात ही सुविधा करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध कामांकरिता येणाऱ्यांची गर्दी याच भागात अधिक असल्याने त्यांना या सुविधेचा लाभ होणे अपेक्षित धरण्यात आले होते. या अपेक्षेनुसार काम होईल, अशी आशा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना असताना त्याचा येथे वेगळाच वापर होत असल्याचे समोर येत आहे.
वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी ती कुठेही आणि सहज उपलब्ध होते, यात शंका नाही. दारू विकत घेतल्यानंतर ती घेण्याकरिता जागेची समस्या असल्याने अनेकांकडून प्रशासकीय भवनाचा आधार घेण्यात येत असल्याचे पोलिसांकडून अनेकवेळा झालेल्या कारवाईतून उघड झाले आहे. तरीही येथे दारूच्या पार्ट्या सुरूच असतात. याच मद्यपींना आवश्यक असलेले थंड पाणी या वॉटर एटीएममधून मिळत असल्याने त्यांचा अतिरिक्त पाण्याचा खर्च वाचत आहे. यामुळे हे एटीएम त्यांच्याकरिता लाभाचे ठरत असल्याचे दिसत आहे. यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे.
रात्रीला मशीन किंवा दार बंद ठेवण्याची मागणी
सर्वसामान्य नागरिकांकरिता सुरू करण्यात आलेल्या वॉटर एटीएमचा लाभ त्यांना होणे अपेक्षित असताना तसे होत नाही. मद्यपींकडून रात्रीच्या वेळीच त्याचा अधिक वापर होतो. हा प्रकार टाळण्याकरिता हे एटीएम असलेल्या इमारतीचे दार रात्री बंद करावे किंवा ही मशीनच रात्री बंद करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.