सेलू शहराला बोरधरणातून पाणी
By admin | Published: May 7, 2016 02:14 AM2016-05-07T02:14:40+5:302016-05-07T02:14:40+5:30
सध्या सेलू शहराला मौजा बेलगाव येथील नळयोजनेच्या दोन विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे.
क्षारयुक्त पाण्यामुळे नवी योजना : जलशुद्धीकरण केंद्रही प्रस्तावित
सेलू : सध्या सेलू शहराला मौजा बेलगाव येथील नळयोजनेच्या दोन विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात विविध आजाराची भीती आहे. तसेच शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून सध्या कार्यान्वित पाणीस्त्रोत अपुरे पडण्याची भीती आहे. या सर्व बाबीचा विचार करून शासनाने सेलू शहरासाठी थेट बोरधरण वरून पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या कामाला हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी बोरधरण ते सेलू या अंतराचे मोजमाप करण्यात आले.
बोरधरणाशेजारी विहिर खोदून तेथून हे पाणी पाईपलाईनद्वारे सेलू शहरात येईल. शहरात जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येईल. सध्या विहिरीवरून थेट पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. शुद्धीकरण यंत्राची सोय नसल्याने तसेच पाणी पिण्यात जाते. सेलू शहरात पुरविण्यात येणाऱ्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक आहे. हे जास्त क्षाराचे प्रमाण आरोग्यासाठी धोकादायक आहे.
सध्या सेलू शहराला ६०० ते ७०० पेक्षा जास्त टी.डी.एस. चे पाणी पुरविल्या जाते. (टीडीएस- टोटल डिझॉल्ट साल्ट) हे पाणी ज्यांच्या घरी छोटे जलशुद्धीकरण यंत्र लावले आहे. ते १०० पर्यंत टी.डी.एस.चे पाणी शुद्ध करून पितात. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा घेण्याची आर्थिक क्षमता नाही त्यांना नगरपंचायत पुरविते तेच पाणी प्यावे लागते. अनेक वर्षांपासून सेलूकर असेच पाणी पीत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित करून ही आरोग्याशी गंभीर बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. उशीरा का होईना शासनाने याची दखल घेतल्याचे दिसते.
सध्या मौजा बेलगाव येथे दोन वेगवेगळ्या पाण्याच्या मोठ्या विहिरी आहेत. सेलूत पाण्याचे जलकुंभ उभारून शहरवासियांना या योनजेद्वारे पाणीपुरवठा होतो. या दोन योजना उभारण्यासाठी जवळपास सव्वातीन कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च झाले. सेलू शहराला कधी पाणी टंचाईची झळ पोहचली नाही; मात्र यंदाच्या उन्हाळ्यात विहिरींचा जलस्तर खाली जावून अवघ्या काही तासात पाणी संपण्याची वेळ आली आहे.
भविष्यात सेलू शहराला पाणीटंचाईचा फटका बसणार हे नक्की आहे. त्यामुळे बोरधरणवरून सुमारे १७ कि़मी. अंतराची पाईपलाईन टाकून व बोरधरणालगत विहीर खोदून सेलूला पाणी पुरवठा करण्याच्या कामाला शासनाकडून हिरवी झेंडी मिळाली आहे. याबाबत नगरपंचायत अध्यक्ष डॉ. राजेश जयस्वाल यांना विचारणा केली असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.(तालुका प्रतिनिधी)