धोंडी-धोंडी पाणी दे ; धान-कोंडा पिकू दे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:34 PM2019-06-20T23:34:30+5:302019-06-20T23:35:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देवळी : जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांगपत्ता नसल्याने परिसरात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : जून महिना संपत आला तरीही पावसाचा थांगपत्ता नसल्याने परिसरात पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. शहर व ग्रामीण भागातील नळयोजनेला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, गावातील सार्वजनिक विहिरी आणि विंधन विहिरींनीही तळ गाठला असून नदीचे पात्र कोरडे पडले आहे. अशा स्थितीत पाण्याअभावी विवंचना वाढल्याने गावोगावी नागरिकांनी निसर्गाची आराधना करायला सुरुवात केली आहे.
देवळी येथील नागरिक शहराच्या कानाकोपºयात धोंडी फिरवून जागर करित आहे. ‘धोंडी-धोंडी पाणी दे, धान-कोंडा पिकू दे’ अशा प्रकारची आर्त हाक देवून वरूणराजाचे मन वळविले जात आहे. यासाठी कंबरेच्या भोवताल निंबाचा पाला गुंडाळून नाचत घरोघरी जाणारी मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच काही ठिकाणी जेवनाच्या पंगतीचे आयोजन करुन निसर्गाची याचना केली जात आहे. खासदार रामदास तडस यांचे कुटुंबीय आणि नालवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्यावतीनेही वर्ध्यातील खासदारांच्या निवासस्थानालगतच्या सार्वजनिक व्यायामशाळेच्या प्रांगणात जेवणाच्या पंगती उठवून अन्नदान करण्यात आले. ‘धोंडी-धोंडी पाणी दे’ म्हणत निसर्गाला पाण्यासाठी हाक देण्यात आली.
यासाठी तडस कुटूंबायातील नालवाडी ग्रा.पं.सदस्य सुनीता मेहरे व मनीषा शेंडे यांनी पुढाकार घेतला. या भागातील जि.प.सदस्य, सरपंच व सदस्यांसह खासदारांचे स्वीय सहाय्यक विपिन पिसे, सुनील राऊत, गजानन जाणवे व नागरिकांनी सहभाग घेतला.