शहरवासीयांना पाण्याकरिता चटके
By admin | Published: April 7, 2017 01:59 AM2017-04-07T01:59:47+5:302017-04-07T01:59:47+5:30
उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. अशात शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने भर उन्हात नागरिकांची
मुख्य जलवाहिनी लिकेज : तीन दिवसानंतर येणार पाणी
वर्धा : उन्हाचा पारा ४४ अंशावर स्थिरावत आहे. अशात शहरात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने भर उन्हात नागरिकांची पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळ आली आहे. सदर लिकेज हे अमृत योजनेचे काम करताना झाल्याची माहिती आहे. हा लिकेज दुरूस्त करण्याकरिता तीन दिवसाचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता खरच हा लिकेज तीन दिवसात दुरूस्त होवून पाणी पुरवठा सुरळीत होतो, अथवा आणखी काही दिवस पाण्याकरिता भटकावे लागते, याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे.
शहरातील नागरिकांना पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होतो. शहराला पाणी पुरवठा करणारी हीच पाईपलाईन इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ लिकेज झाली आहे. तिच्या दुरूस्तीचे काम सुरू आहे. गत काही दिवसांपूर्वी हिच जलवाहिनी लिक झाली होती. ही जलवाहिनी मुख्य असून ती अत्यंत जुनी आहे. लिकेज झालेल्या ठिकाणी मुख्य जलवाहिनी वरून २०० एम.एम. व्यासाची पाईप आडवी गेली असून लगतच ११ केव्हीची वीजजोडणी ही आहे. त्यामुळे दुरूस्तीचे काम जिकिरीचे व वेळखाऊ झाले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता नगर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
३०.५३ कोटींची अमृत योजना
शहरात अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ झाला आहे. यात शहरातील ९० टक्के पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेसाठी ३० कोटी ५३ लाख रुपयांचा निधी खर्ची घातला जात आहे. या योजनेच्या कामाला आरती चौक परिसरातून प्रारंभ करण्यात आला आहे. संपूर्ण शहरातील जुन्या पाईपलाईन या योजनेंतर्गत बदलण्यात येणार आहे. यासाठी पाईप तयार असून खोदकाम सुरू करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली आहे. हे काम करीत असतानाच पाईपलाईन थोडी डॅमेज झाली; पण दुरूस्ती युद्धस्तरावर सुरू असून लवकरच पाणी पुरवठा सुरू होईल, असेही पालिकेच्यावतीने सांगण्यात आले.