५१ गावांत जलयुक्त शिवार अभियान
By admin | Published: June 7, 2015 02:22 AM2015-06-07T02:22:21+5:302015-06-07T02:22:21+5:30
भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.
६५ टक्के कामे पूर्ण : ९० कोटींच्या निधीतून केली जाताहेत कामे
कारंजा (घा.) : भूजल पातळी उंचावणे, जमिनीचा पोत सुधारणे, सिंचन क्षमता वाढविणे, जमिनीची लेव्हल समतल करणे या उद्देशाने शासनाने महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. यात तालुक्यातील ५१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांना प्रारंभ करण्यात आला असून यासाठी ९० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
अभियानातील प्रस्तावित कामे कृषी विभाग, लघुसिंचन जि.प., राज्य लघुसिंचन, वनविभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, पंचायत समिती व सामाजिक संस्था या सात यंत्रणेमार्फत नि:शुल्क केली जाणार आहे. निवड झालेल्या ५१ पैकी ४१ गावांत तालुका कृषी विभागातर्फे नाला खोलीकरण, धाडीचे बांध, सिमेंट बंधारे, गॅबीयन बंधारे आदी कामे फेबु्रवारी महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. यात ३३ शेततळे असून २७ कामे पूर्ण झालीत. ६ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. १०४ धाडीच्या बांधापैकी ८७ बांध पूर्ण झाले असून १७ बांध अपूर्ण आहेत. २३ सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम सुरू असून एकही बंधारा पूर्ण झाला नाही. नाला खोलीकरणाची ९६ कामे सुरू असून ६६ पूर्ण झाली तर ३० अपूर्ण आहे. पाच गॅबीयन बंधाऱ्यांपैकी चार पूर्ण झाले असून एकाचे काम सुरू आहे. ५१ गावांत सुक्ष्म सिंचनाची २१० कामे पूर्ण झाली आहेत.
२० जूनपर्यंत सर्व कामे पूर्ण व्हावीत, असे शासनाचे धोरण आहे; पण यंत्राची उपलब्धता, शेतकऱ्यांच्या अडचणी व कमी अवधीतील अधिक कामांमुळे ३० जूनपर्यंत कामे पूर्ण होतील, अशी माहिती जलशिवार अभियानाचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी व्ही.बी. महंत यांनी दिली. अन्य सहा यंत्रणेमार्फत कोणती कामे सुरू आहे व कामांची सद्यस्थिती काय, याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अद्याप पोहोचली नसल्याने अप्राप्त आहे.
एकंदरीत ६५ टक्के कामे झाली असून ३५ टक्के कामे व्हायची आहेत. येत्या १५ दिवसांत पाऊस आला तर ही कामे कशी पूर्ण होतील, हा प्रश्नच आहेू. एकदा शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरू झाला की, आपोआपच या कामांना अडथळा निर्माण होईल. यामुळे शासनाची योजना उदीष्टाप्रत पोहचणार की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.(तालुका प्रतिनिधी)