वॉटर कप स्पर्धेचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:58 PM2019-04-08T21:58:25+5:302019-04-08T21:59:59+5:30
दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : ८ एप्रिल, दिवसाच्या पहिल्या ठोक्यालाच सेलू तालुक्यातील दिंदोडा आणि हिवरा ग्रामवासीयांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेकरिता संपूर्ण गावाने एकत्र येत मोठ्या उत्साहाने जलदेवतेची पूजा तसेच श्रमदान करून सुरुवात केली.
रात्रीचे १२ म्हणजे गावामध्ये शुकशुकाट असतो; परंतु ८ एप्रिलची रात्र म्हणजे गावामध्ये जल्लोष बघायला मिळाला. गावामधील प्रत्येक नागरिक आपापल्या घरातील कुदळ, फावडे घेऊन गाव पाणीदार करण्याचा दृढ निश्चय करून तेथे उभा असल्याचा प्रत्यय त्यावेळी आला. या ग्रामस्थांना साथ देण्यासाठी शहरातूनही मंडळी मोठ्या संख्येने आली होती.
त्यामध्ये प्रामुख्याने सेवाग्राम रुग्णालयातील डॉ. उल्हास जाजू, वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे, डॉ. प्रदीप सुने, डॉ. राजेश सरोदे, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, प्रा. श्याम भेंडे, सचिन गरपाल, अनंत बोबडे, लोहे आदी उपस्थित होते.
दिंदोडा गावामध्ये जलदेवतेची तसेच यंत्र सामग्रीची पूजा करण्यात आली आणि ‘जल है तो कल है’ यांसारखे जलजागृतीचे नारे देत श्रमदानाला सुरुवात करण्यात आली. तसेच हिवरा या गावामध्ये संपूर्ण गावातील लोकांनी एकत्र येऊन यंत्रसामग्रीची पूजा गावातील महिला आणि चिमुकल्यांकडून प्राधान्याने करून घेऊन नंतर दुष्काळरूपी राक्षसाच्या पुतळ्याचे गावातील चौकात दहन करण्यात आले. यावर्षी आपले गाव दुष्काळमुक्त करण्याची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.
तसेच संपूर्ण गावाने गावानजीकच्या शेतात कंटोर टाकून श्रमदान केले. उपस्थित लोकांना डॉ. उल्हास जाजू तसेच वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी प्रोत्साहन तसेच मार्गदर्शन केले. यावेळी पाणी फाऊंडेशन समन्वयक चंद्रशेखर तसेच गावातील प्रशिक्षित तरुणांनी विशेष श्रम घेतले.
मागीलवर्षी पाणी फाउंडेशनअंतर्गत आर्वी तालुक्यातील दोन गावांना पुरस्कार मिळाला. आपल्याही गावाला पुरस्कार मिळावा, पाणी समस्या कायमचे निकाली निघावी, गाव पाणीदार व्हावे याकरिता ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. यात युवकांसह महिला आणि पुरुषांचाही सहभाग असून त्यांनी पुरस्कार मिळविण्याचा निर्धार केला आहे.