वॉटर कप स्पर्धा झाली लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:37 PM2018-04-30T22:37:03+5:302018-04-30T22:37:27+5:30
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत आता बरीच रंगत आली आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१० गावांत जलसंधारण कामांसाठी हजारो हात सरसावले आहेत. दररोज महाश्रमदानातून गावांना जलमय करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. वॉटर कप ही आता केवळ स्पर्धा राहिली नाही तर तिला लोकचळवळीचे स्वरूप आल्याचेच दिसत आहे.
खुबगाव येथे सर्वपक्षीय श्रमदान
आर्वी - खुबगाव येथील वाठोडा मार्गावर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील जलसंधारणाच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. ही स्पर्धा आता लोकचळवळ झाली असून यात गावातील सुशिक्षीत युवा पिढी, गृहीणी, महिला सरपंचा सोबतच आ. अमर काळे, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, डॉ. रिपल राणे, पत्रकार, वकील यांच्यासह १०० ते १५० लोकांनी श्रमदानात भाग घेतला. खुबगाव शिवारात सुमारे दोन तास चाललेल्या श्रमदानात १४५ घनमीटर काम झाले. लहान-थोरांपासून विविध सामाजिक संघटनांनी तथा राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी तथा महिला पुरूषांनी न थकता परिश्रम करीत सहभाग घेतला. सर्वांनी टिकास, फावडे, टोपले घेऊन आपापली जबाबदारी समजून श्रमदान केले. श्रमदान करण्याकरिता आ. अमर काळे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, बाका सोनटक्के, लॉयन्स क्लबचे रिपल राणे, माजी न.प. उपाध्यक्ष पुरूषोत्तम नागपुरे, सुशील ठाकुर, परवेज साबीर, मित्रपरिवाराचे गौरव जाजू, पर्यावरण समितीचे पदाधिकारी, व्हॉलीबॉल समर कॅम्पचे कपील ठाकूर, पं.स. उपसभापती धर्मेंद्र राऊत, अॅड. गुरुणा सिंघाणी, अॅड. मिलिंद राऊत व वकील तसेच जयंत देवरकर, पाणी फाऊंडेशनचे करटकार, नितीन टरके, तृष्णा उमक, प्रणाली गवळी, शुभम अमझरे, यश बोरगावकर, खुबगावच्या सरपंच वनमाला काळपांडे, उपसरपंच दिलीप गवळी, पं.स. सदस्य अशोक तुमडाम, प्रमोद मोहोड, देवराव भाकरे, ग्रा.पं. सदस्य, महिला बचत गटांनी श्रमदान केले. आ. काळे यांनी आतापासूनच पाण्याची बचत कशी करता येईल, यासाठी जनतेने सर्तक राहण्याचे आवाहन केले. श्रमदात्यांचे आभार शरद उमक यांनी मानले.
परसोडीत शिक्षकांचे श्रमदान
विरुळ (आकाजी) - वाटर कप स्पर्धेत सहभागी परसोडी गावात श्रमदानाचे तुफान कायम आहे. गावातील महिला, पुरुष, युवक तथा चिमुकले सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत अविरत श्रमदान करीत आहे. जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी परसोडी येथे श्रमदान केले. नेहरु विद्यालय विरुळ, विवेक महाविद्यालय मांडवा येथील शिक्षकांनीही गावात श्रमदान केले. सर्वांनी मिळून अवघ्या चार तासांतच २१० मिटर मीठाईचा बांध खोदला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम बांधावरच ऐकला.
जलमित्र परिवार सालई येथे महाश्रमदान
हिंगणी - सेलू तालुक्यातील सालई (पेवट) येथेही पाणी फाऊंडेशन अंतर्गत महाश्रमदान केले जात आहे. त्यांना प्रोत्साहन देतानाच ग्रामस्थांचा सहभाग वाढावा म्हणून हिंगणी येथील जल मित्र परिवाराने प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन विविध उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला. हातात टिकास, फावडे व टोपले घेऊन ते काम करीत असून पाणी संवर्धनाचे महत्त्व पटवून देत आहेत. समाजातील विविध बाबींवर जल मित्र परिवार सामाजिक बांधीलकी जोपासत श्रमदानात प्रत्यक्ष सहभाग घेत आहे. यात नितीन निघडे, पोलीस पाटील मारोती चचाणे, रूपेश ठाकरे, आशिष कांबळे, शुभम सराफ, मंगेश काळे, गजानन सातपुते, सचिन देवरे, सागर धवणे, विकी जाधव, कुणाल बोरकर, अनुज निघडे, जुगनाके यासह ४० मुले तथा गावातील वृद्ध, युवक, महिला, चिमुकले राबत आहेत. तत्पूर्वी बोरी, बोरधरण येथे श्रमदान केले. अन्य गावांतही ते पोहोचणार आहेत.