शेतकऱ्यांवर जलसंकट, भाजीपाला पीक करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:06 PM2019-02-25T22:06:50+5:302019-02-25T22:07:28+5:30
यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतातील विहिरींची पाणीपातळी पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही. याचाच परिणाम म्हणून फेब्रुवारीतच शेतातील विहिरींनी तळ गाठला असल्याचे चिकणीसह परिसरात दिसून येते. पाण्याअभावी भाजीपाला पीकही करपण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
चिकणी येथील अल्पभूधारक शेतकरी विजय डायरे यांनी ओलिताखाली असलेल्या एक एकर शेतात विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड केली होती. लागवडीकरिता त्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्चही केला. यामध्ये त्यांनी वांगी, मिरची, कांदा, लसूण, मेथी आदी भाजीपाला पिकाची लागवड केली होती. परंतु, ऐन फेब्रुवारीतच विहिरीचे पाणी आटल्यामुळे पिकांना ओलिताची समस्या निर्माण आणि पीक करपले. यात डायरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाणी... जपूनच!
शहरासह लगतच्या ११ गावांतील नागरिकांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ग्रामीण भागात नागरिक पाण्याची अनावश्यक नासाडी करीत आहे. रस्त्यावर सकाळी व सायंकाळी नळाद्वारे पाणी मारत आहे. तसेच घराशेजारी वाहने धुण्याचे काम केले जात आहे. अनेक जण पाणी चक्क नाल्यांमध्ये सोडून देतात. तेव्हा नागरिकांनी पाण्याचा जपूनच वापर करावा, असे आवाहन सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
पाणीपातळीत झपाट्याने घट
यावर्षी जिल्ह्यात ७७ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे पाणीसंकट अतिशय तीव्र स्वरूपात राहणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच अनेक भागात विहिरींची पातळी खोल गेली आहे. शेतातील मोठ्या विहिरींच्या पाणी पातळीतही घट झाली असून शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने अनेक नागरिकांनी बोअरवेल तयार केल्या. मात्र, मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तयार केलेल्या बोअरवेलचीही पातळी खोल गेली आहे. काही ठिंकाणी बोअरवेल कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात वर्धा जिल्ह्यावर तीव्र पाणी संकटाची छाया पसरली आहे.
पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न
चिकणीसह परिसरात यापूर्वी एप्रिल, मे महिन्यात विहिरींचे पाणी आटत असे. अल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी मात्र फेब्रुवारीमध्येच विहिरी कोरड्या ठाक झाल्या आहेत. यामुळे पिकांना ओलित करणे अवघड झाले असतानाच पिण्याच्या पाण्याचासुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. प्यायलाच पाणी नाही, तर पिकांना ओलित करण्यासाठी पाणी आणायचे तरी कोठून असा प्रश्न
परिसरातील शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.
शेतात गहू, आणि हरभऱ्याची सप्टेंबर महिन्यातच लागवड केली होती. त्यामुळे ही पिके जोमात बहरले आणि बºयापैकी उत्पन्नही घेता आले.
- विजय डायरे, शेतकरी, चिकणी (जा.).