कालव्याची साफसफाई न करताच सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:56 PM2018-11-02T21:56:06+5:302018-11-02T21:57:03+5:30
खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : खरीप हंगाम संपल्याने आता रब्बी हंगाम सुरू झाला. रब्बीच्या सिंचनासाठी अप्पर वर्धा धरण विभागाने कालव्याची साफसफाई न करताच पाणी सोडले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंत्याच्या कार्र्यालयात जावून जाब विचारला असता त्यांनी कार्यालयातून शेतकऱ्यांना हुसकावून लावले. याप्रकरणी मुजोर अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तत्काळ दुरूस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अप्पर वर्धा धरण विभाग अंतर्गत उर्ध्व वर्धा पाटबंधारे उपविभाग क्रमांक पाच हे कार्यालय तळेगावला आहे. यास कार्यालयातर्गत लहान आर्वी-किन्हाळा, खडकी-किन्हाळा, अंतोरा-बेलोरा कालवे येतात. या एकूण २२ कि़मी. लांबीच्या कालव्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठमोठी बाभुळची झाडे वाढली आहेत. गवत व रायमुन्यानी पूर्ण भाग झाकला आहे. याची साफसफाई करण्यासाठी पाणी वापर संस्थानी मागणी केली होती. त्यासाठी उपविभागीय अभियंता आर.ए. भोमले यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. त्यांनी दुरूस्ती व साफसफाईचे अधिकार जलसंपदा विभाग अमरावतीच्या अभियांत्रिकी विभागाला असल्याचे सांगितले.
त्यानंतर शेतकऱ्यांनी अमरावतीला कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोडे यांची भेट घेवून तात्काळ कालवे साफसफाई करण्याची मागणी केली असता कार्यकारी अभियंत्यानी अरेरावी व मुजोरी करीत मला सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस राहिले. तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, अशी दमदाटी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना आल्या पावलीच परत जावे लागले. याप्रकरणी अधीक्षक अभियंता व मुख्य अभियंता यांना कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. जलसंपदा विभागाने कालवे चांगले दुरूस्त व डागडुजी करून पाणी वापर संस्थेला हस्तांतरीत करायला पाहिले होते. मात्र दुरूस्तीसाठी मनुष्यबळ नाही, निधी मंजूर नाही, मशीनवर आॅपरेटर नाही, अशी कारण देवून शेतकऱ्यांची बोळवण केल्या जात आहे. लहानआर्वी-किन्हाळा-खडकी या ६ कि़मी. लांबीच्या एकाच कालव्यावर ४०४४ हेक्टरचे सिंचन आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी ऐन रब्बीच्या पिकासाठी शेतात पाणी न्यायचे कसे असा प्रश्न आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. २००५ च्या पाणी वाटप कराद्यानुसार कालवे दुरूस्ती करणे प्रत्येक विभागाला बंधनकारक आहे. मात्र अप्पर वर्धा धरण विभाग पांढरा हत्तीच्या भूमिकेत वावरत आहे. हा अन्याय तात्काळ दूर करून कालव्याची पूर्ण साफसफाई करावी आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी श्रीकृष्ण पाणी वापर संस्था परसोडा-खडकी, गजानन महाराज पाणी वापर संस्था खडकी-किन्हाळा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नागपूरे, मंगेश नागपूरे, शंकर नागपूरे आदींनी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कालव्याची साफसफाई करण्यासाठी कार्यकारी अभियंता व अधिनस्त अधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. शेतकऱ्यांसोबत उद्धट वर्तन केल्याची तक्रार प्राप्त होताच चौकशी करून कार्यकारी अभियंता पोटफोडे यांच्यावर कारवाई करणार.
- आर.के. ढवळे
अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, अमरावती.