विहिरींची जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:52 PM2018-11-09T23:52:36+5:302018-11-09T23:53:18+5:30

यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील विहिरींची जलपातळी खालावली आहे. महिनाभरात दीड मीटर पाणी घटल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण होणार आहे.

The water level of the wells decreased | विहिरींची जलपातळी खालावली

विहिरींची जलपातळी खालावली

Next
ठळक मुद्देपाणीटंचाई : महिनाभरात दीड मीटरपर्यंत पाण्याने गाठले तळ

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील विहिरींची जलपातळी खालावली आहे. महिनाभरात दीड मीटर पाणी घटल्याने यावर्षीच्या उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण होणार आहे.
तालुक्यातील थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी, किन्ही, मोई, पोरगव्हाण, पंचाळा, झाडगाव, कोल्हाकाळी, पांढुर्णा या ११ गावातील पाण्याची परिस्थिती फार बिकट आहे. सार्वजनिक विहिरीमध्ये काहीसा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नळाला कुठे एक दिवसाआड, कुठे दोन दिवसाआड तर कुठे तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विहिरींसोबतच हॅण्डपंप, बंधारे, तळे यातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. थार, चामला, बांबर्डा, बोरखेडी हा भाग अवर्षणप्रणय आहे. येथे गवळी समाज मोठ्या संख्येने असल्यामुळे त्यांच्याकडे गोधन बऱ्याप्रमाणात आहे. पण, पाण्याअभावी त्यांचाही व्यवसाय अडचणीत आला आहे.
रेड झोन, डार्क झोन, येलो झोन या तीन झोनमध्ये दुष्काळी व टंचाईग्रस्त गावे वाटल्या गेली आहे. त्यामुळे शासनाने या भागाला कायम दुष्काळमुक्त करण्यासाठी कामे करण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार अभियानातील तालुक्याती कमी गावे समाविष्ट केली. त्यामुळे यावर्षी निधी प्राप्त झाला नाही.
भूजलपातळीत झालेली घट शेतकरी वर्गाला प्रचंड नुकसानीची ठरणारी आहे. संत्रा बाग, मोसंबी बाग, सिंचन करायला सुद्धा पाणी नाही. त्यामुळे अनेक गावात शेतकºयांनी बागा कापून टाकायला सुरूवात केली आहे. तालुक्यातील पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेऊन शासनाने ताबडतोब कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आता शेतकरी व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
हिवाळ्यातच ११ गावांतील ३८ विाहिरी झाल्या कोरड्या
पावसाअभावी जिल्ह्यात सर्वत्रच पाण्याचे भीषण वास्तव आहेत. आष्टी तालुका हा शासनाने दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीरही केला आहे. या तालुक्यातील पाणी परिस्थिती लक्षात घेतली असता यावर्षी हिवाळ्यातच ११ गावांतील जवळपास ३८ विहिरींनी तळ गाठले आहे. या विहिरींना सप्टेंबर अखेरपर्यंत पाणी होते. परंतु जमिनीतील पाण्याची पातळी दीड मीटर खोल गेली आहे. त्यामुळे या सर्व विहिरींतील पाण्यांनीही तळ दाखवले आहे. यावरुन अगामी पाणी टंचाईचे संकेत मिळत असल्याने लवकरात लवकर यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

पंचाळा गावात गेल्या २५ वर्षापासून भीषण पाणीटंचाई आहे. या गावात एकमेव विहीर आहे. सर्व विहिरींनी तळ गाठले तरीही या विहिरीला पाणी असायचे. मात्र यावेळी अल्पसा जलसाठा असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
-श्रीराम मेहारे, सरपंच

मोई या गावातील पाण्याचे सर्व स्त्रोत संपुष्टात आले. बाराही महिने पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो.पाणीपुरवठा योजना मंजूर झाली, पण काम व्हायचे आहे. यावर्षी पाण्याचा प्रश्न असून शासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
- पद्मा कुसराम, सरपंच

आष्टी तालुक्यातील पाणी परिस्थिती बिकट असल्याने या पाणीबाणीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागत आहे. विशेषत: या तालुक्यात गवळी समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांचा दुग्ध व्यवसायही जोरात आहे. पण, पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने जनावरांच्या चाºयासह पिण्याचा प्रश्नही तोंड आवासून असल्याने दुग्ध व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे . तसेच शेती पिकांच्याही नुकसानीला समोरे जावे लागणार आहे.

बांबर्डा व बोरखेडी गावात उंचावरील भाग असल्याने आताच पाणी नाही. शेतकरी शेतातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणत आहे. या गावांना प्रशासनाने टँकरद्वारे पुरवठा करण्याचा ठराव घेणार असून प्रशासनाने त्याची दखल घ्यावी.
- अर्चना नायकुजी, सरपंच

थार व चामला गावात पाणीसाठा कुठेही शिल्लक नाही. शेतामधूनच सध्या पिण्यासाठी व वापरासाठी पाणी वापरल्या जात आहे. या गावात प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा.
- वनीता केवटे, सरपंच

Web Title: The water level of the wells decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी