जल पातळी वाढविण्यासाठी पाणी जिरविणे गरजेचे; सुदर्शन जैन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 03:21 PM2018-04-23T15:21:22+5:302018-04-23T15:21:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: पाण्याला पन्नासहून अधिक नावांनी संबोधले जाते; पण सध्याच्या विज्ञान युगातही पाण्याला पर्याय नाही. शेतीसह विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात भु-गर्भातील पाण्याचा वापर केल्या जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील जलपातळी खाली जात आहे. ही चिंतेची बाब आहे. जमिनीतील जल पातळी वाढविण्यासाठी पाणी जिरविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी केले.
भारतीय जैन संघटनेच्या पुढाकाराने स्थानिक विकास भवन येथे पार पडलेल्या विविध सामाजिक संघटनांच्या जलसंवर्धनाबाबतच्या विशेष बैठकीत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर खा. रामदास तडस, आ. अनिल सोले, प्रदीप जैन, अभ्युदय मेघे, जल तज्ज्ञ माधव कोटस्थाने, डॉ. उल्हास जाजू, योगेंद्र फत्तेपुरीया, पाणी फाऊंडेशनचे अशोक बगाडे, मंदार देशपांडे यांची उपस्थिती होती.
सुदर्शन जैन पुढे म्हणाले, विदर्भाला पूर्वी भरघोस कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून ओळख होती. आताही ती असली तरी येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असल्याने ते शेतकरी आत्महत्येचे केंद्र बनत आहे. येथील शेतकरी विविध पिकांना सिंचनासाठी भु-गर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. जमिनीतील जल पातळी वाढविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांने पावसाचे पाणी गावातच कसे मुरेल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय असून शेतकरी आत्महत्येची कारणे शोधण्यापेक्षा त्या कशा थांबविता येईल या दृष्टीने आज प्रयत्न होणे काळाची गरज आहे. सिने अभिनेता अमिर खान यांच्या पुढाकाराने तीन तालुक्यांची निवड करून सुरूवात झालेली जल संवर्धनाची चळवळ गत दोन वर्षातच वटवृक्ष होऊ पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.
यंदा वॉटर कप स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील चार तालुक्यातील २०० गावे सहभागी झाली आहेत. या गावातील नागरिकांसह इतर गावातील नागरिक श्रमदान करीत विविध जलसंवर्धनाची विविध कामे करीत आहेत. सर्वच कामे श्रमदानाने होत नसल्याने व यंत्रांची गरज लागत असल्याने जैन संघटनेच्यावतीने १२० जेसीबी व १४ पोकलॅन्ड उपलब्ध करून देण्यात आले आहे. या यंत्रांसाठी लागणारे इंधन मुख्यमंत्र्यांच्या सुचनांवरून ग्रा.पं. उपलब्ध करून देणार आहे. या यंत्रांचा उपयोग त्या-त्या गावातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत करून घ्यावा, असे आवाहनही यावेळी सुदर्शन जैन यांनी केले.
सर्वच कामे श्रमदानाने होत नाहीत. बहुदा श्रमदानाला यंत्राची जोड द्यावी लागत असल्याचे यावेळी पाणी फाऊंडेशनचे अशोक बगाडे यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक योगेंद्र फत्तेपुरीया यांनी तर संचालन मनोज श्रावणे यांनी केले. कार्यक्रमाला निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे, एस. एम. लंगडे, डी. एन. खराबे, शेखर भागवतकर, नितीन जैन, जयंत देवरकर, गौरव ठाकरे, सतीश पठाडे, चेतन निंबुळकर, अभिषेक बेद, गजानन धुर्वे, आशा गोडघाटे, सुप्रिया तेलंगे, जोत्स्रा परियाल यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. यशस्वीतेकरिता संदीप बोत्रा, विनोद ढोबळे, प्रविण जैन, विकास पोहोरे, अशोक सावळकर, केशव भुसारी, विमल चोरडिया आदींनी सहकार्य केले.
यंत्रांच्या इंधनाचा प्रश्न सोडवू - तडस
संभाव्य जलसंकट लक्षात घेऊन राज्य व केंद्रातील भाजपा सरकार विविध प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसच्या काळात सुरू करण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचे काम अपूर्ण राहिल्याने शेतकºयांच्या अडचणीत भर पडली. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढल्या. पाणी पातळी कमी होत असल्याने पावसाचे पाणी जीरविणे गरजेचे आहे. श्रमदानातून होत असलेल्या विविध कामांना नागरिकांनी सहकार्य करावे. मुळात आपण पहेलवान असून आठवड्यातून दोन दिवस श्रमदान करीत अंग मेहनत करतो. जेसीबी व पोकलॅन्ड यांच्या इंधनाची समस्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी खा. तडस यांनी दिले.
पाणी अडवा पाणी जिरवा काळाची गरज - सोले
आज देशात जितका पाऊस होतो त्यापैकी मोठ्या प्रमाणात पाणी नदी, नाल्यांनी वाहून जात समुद्रात जाऊन खारे होते. राज्या-राज्यात गोड्या पाण्यासाठी वाद होताना दिसत आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडावे व ते खारे होता कामा नये यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवे. पाणीदार गावशिवार ही सध्या लोकचळवळ झाली आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही काळाची गरज आहे, असे यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. अनिल सोले यांनी सांगितले