सेवाग्राम मार्गावरील जलवाहिनी फुटली
By admin | Published: September 6, 2016 01:59 AM2016-09-06T01:59:44+5:302016-09-06T01:59:44+5:30
न.प. अंतर्गत येत असलेली मुख्य मार्गावरील महिला आश्रम शाळेसमोरील जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली
सेवाग्राम : न.प. अंतर्गत येत असलेली मुख्य मार्गावरील महिला आश्रम शाळेसमोरील जलवाहिनी तीन ठिकाणी फुटली आहे. यातून सतत पाणी वाहत असल्याने डबके तयार झाले. पाण्याचा अपव्यय होत असून साचलेल्या पाण्याच्या डबक्यातील पाण्यात डास निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्य मार्गावरून पालिकेची जलवाहिनी गेली आहे. सदोष कामामुळे ती गत अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी सतत फुटत असते. दुरूस्ती केल्यानंतरही काही महिन्यातच ती वारंवार फुटून पाण्याचा अपव्यय होतो. सध्या तरी श्री हनुमान मंदिराजवळ दोन ठिकाणी आणि पेट्रोलपंपजवळ ती फुटल्याचे दिसून आले आहे. नागरिकांच्या घरी पाणी पोहोचविण्याकरिता असलेली ही पाईपलाईन हनुमान मंदिराजवळही फुटली आहे. येथूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. पाईप फुटल्याने दोन दिवसांपासून येथे २४ तास पाणी वाहत आहे. यात लाखो लिटर पाणी वाया जात असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
फुटलेल्या पाईपमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे डबके तयार झाले आहे. वाहनामुळे लोकांच्या अंगावर पाणी उडत असल्याने संताप निर्माण होतो. हेच साचलेले पाणी परत जलवाहिनीतून नागरिकांच्या घरी नळातून जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देत पाईपचे झालेले लिकेज दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)