हिंगणघाट येथे पाणी प्रश्न पेटला; राकाँ पदाधिकाऱ्यांनी टँकरवर बसून रेटला!
By महेश सायखेडे | Published: April 10, 2023 05:11 PM2023-04-10T17:11:00+5:302023-04-10T18:25:01+5:30
जनआक्रोश : प्रत्यक्षात १४० दिवस पाणी पुरवठा, कर घेतला जातोय ३६५ दिवसांचा
वर्धा :हिंगणघाट शहरातील नागरिकांना प्रत्यक्षात १४० दिवस पाणी पुरवठा करून पालिका प्रशासन चक्क ३६५ दिवसांचा पाणीपट्टी कराची वसुली करीत आहे. हिंगणघाटवासीयांना ३६५ दिवस पाणी पुरवठा करा ही प्रमुख मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पाण्याच्या टँकरवर चढत आणि हिंगणघाट शहरातून काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातून रेटली.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय परिसरातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून नगरपालिका कार्यालय गाठले. मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांनी हिंगणघाट नगरपालिका प्रशासन आणि भाजप सरकारच्या सर्वसामान्य विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. मोर्चा नगरपालिका कार्यालयावर धडकल्यावर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन पालिका प्रशासनाला सादर केले.
आंदोलनाचे नेतृत्त्व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले. मोर्चात दिवाकर गमे, प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, राजू मेसेकर, शेखर ठाकरे आदी सहभागी झाले होते.
या प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष
शहरातील अकरा जलकुंभातून हिंगणघाट शहराला ३६५ दिवस नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. अमृत योजनेंतर्गत होत असलेल्या विकास कामाची चौकशी करून गौडबंगाल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वाॅर्ड, रामनगर वाॅर्ड, संत तुकडोजी वॉर्ड, शहा लंगडी रोड रिठे कॉलनी या भागातील पाणी टंचाईची समस्या तातडीने निकाली काढण्यात यावी आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या.