पाणीसमस्या कायम; उपाययोजना नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 10:20 PM2019-04-25T22:20:51+5:302019-04-25T22:21:13+5:30

पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.

Water problem persisted; There is no solution | पाणीसमस्या कायम; उपाययोजना नाही

पाणीसमस्या कायम; उपाययोजना नाही

Next
ठळक मुद्देजलकुंभ ठरलेत शोभेचे : नागरिकांत रोष, अनेकांना विकत घ्यावे लागतेय पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : पाण्यासाठी सुकाळ अशी गावाची ओळख असली तरी पाण्याचे नियोजन बिघडल्याने उन्हाळ्यात मानवासह जनावरांना पाणीसमस्येचे चटके सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे. ग्रा. पं. प्रशासनाने यावर अद्याप तोडगा काढल्याचे दिसत नाही.
गाव पाच प्रभागात विभागले असून सहा हजारांवर लोकसंख्या आहे. शेती, मजुरी, नोकरी आणि पशुपालन असे सामान्यत: रहिवाशांचे रोजगाराचे साधन आहे. सध्या तीन जलकुंभ असले तरी सेवाभावीनगरवासीयांसाठी जलकुंभ शोभेचा ठरलेला आहे. अनेक वर्षांपासून तो बंद असून रहिवाशांनाच व्यवस्था करावी लागली आहे. मूळ गाव आणि आदर्शनगर येथे जलस्वराज्य योजनेतील जलकुंभातून रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो.
मूळ गावात प्रभाग एक, दोन व पाच यांना तीनवेळेत प्रभागाप्रमाणे पाणी सोडण्यात येत असले तरी बहुतांश लोकांना पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. आदर्शनगरात जलसमस्या कायम असून पाण्याबाबत आढावा घेण्यात आला. मात्र, आठवडा लोटूनही आदर्शनगरमध्ये नियोजित विहिरीत मोटार लावण्याचा संबंधितांना मुहूर्त सापडलेला नाही. पशुधनात गाई आणि शेळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत. जवळपास तीस दूध उत्पादक असून काही किरकोळ आहेत. दहा शेळीपालन करणारे आहेत. काहींकडे पंधरा ते वीस शेळ्या आहेत. दोन, तीन शेळ्या पाळणाऱ्यांचीही बºयापैकी संख्या आहे. पशुपालन व्यवसाय असला तरी गावात जनावरांकरिता पाण्याचा हौद नाही. १९६० मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाने बांधला होता. आश्रम प्रतिष्ठान आपल्या विहिरीतून ते टाके भरायचे. पण, कालातंराने ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने टाक्याची दुरवस्था झाली. हौद कायमचा बंद झाला. उपयोग नसल्याने नाली बांधकामात हौद तोडण्यात आला. कडक उन्हाळ्यात लोकांना पाणी नाही. तेथे आता जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हौदाची मागणी पशुपालक करू लागले आहेत. ग्रामपंचायतीने दखल घेण्याची गरज आहे.

जलस्वराज्यअंतर्गत विहीर व जलकुंभातून मूळ गावात पाणी पुरवठा केला जातो. पाणीपातळी खालावली आहे. शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही. आदर्शनगरमध्ये लवकरच नियोजित विहिरीवर मोटर लावून समस्या निकाली काढण्यात येईल. ग्रा.पं. पाण्याचा हौद निर्माण करून गोपालकांकरिता पाण्याची सुविधा करणार आहे.
- संजय गवई, उपसरपंच, सेवाग्राम.

पशुपालकांना पाणी समस्या भेडसावत आहे. गाई व शेळ्यांची संख्या वाढली असल्याने घरी व्यवस्था करू शकत नाही. शेळी पालन आमचा व्यवसाय असल्याने पाण्याचा हौद आवश्यक असून त्याची तात्काळ व्यवस्था ग्रा.पं. प्रशासनाने करून द्यावी.
- नशीरखाँ पठाण

ग्रामपंचायत प्रशासनाची नियोजनशून्यता
सेवाग्रामात पाणीसमस्या तीव्र झाली आहे. तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने रखरखत्या उन्हात कूपनलिका, विहिरींवर धाव घ्यावी लागत आहे. गावात ज्यांच्याकडे पुरेसे पाणी आहे, त्यांनी पाणीविक्री सुरू केली आहे. एकेकाळी पाण्याचा सुकाळ असलेल्या या गावात केवळ ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहे.

Web Title: Water problem persisted; There is no solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.